केडगाव : कोरोनाची दुसरी लाट केडगावकरांंसाठी खूपच धोकादायक ठरली होती. मात्र, या भीतिदायक वातावरणातून केडगाव आता सावरत आहे. येथील सक्रिय रुग्णांंची संख्या केवळ सातवर पोहोचली आहे. रुग्णसंख्येत होणारी कमालीची घट केडगाव कोरोनामुक्तीसाठी पोषक ठरत असली तरी धोका पूर्ण टळलेला नसल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. केडगावात आतापर्यंत २१ हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
केडगावमध्ये आतापर्यंत २ हजार ७०० जणांना कोरोनाची बाधा झाली. यातून जवळपास ९२ टक्के रुग्ण बरे झाले. सप्टेंबर महिन्यात केडगावमध्ये २८ कोरोनाबाधित होते. यातील २१ रुग्ण बरे झाले. सक्रिय रुग्णांची संख्या केवळ ७ राहिली. एकाच कुटुंबात रुग्णसंख्या आढळून येत असल्याने कोरोनाबाधित रुग्ण अद्यापही घरीच राहून उपचार घेत असल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले. बाधित रुग्णांनी तत्काळ आरोग्य विभागाला माहिती देऊन योग्य उपचार करून घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. रुग्णसंख्येत मोठी घट होत असली तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. यामुळे नागरिकांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी गिरीष दळवी यांनी केले. सध्या कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा होत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांचे लसीकरण झाले नाही, त्यांनी लसीकरण करावे, असे आवाहन दळवी यांनी केले. नागरिकांनी खबरदारी घेतल्यास लवकरच केडगाव कोरोनामुक्त होईल, अशी शक्यता आहे.
---
केडगावची कोरोनाची सद्यस्थिती
सक्रिय रुग्ण- ०७, लसीकरण- पहिला डोस- १३६९७, दुसरा डोस- ७४६१, एकूण लसीकरण- २११५८.
---
सध्या केडगाव परिसरात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट झाली. महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने केडगाव परिसरात ठोस उपाययोजना केेल्या. तसेच लसीकरणात आघाडी घेतली. रुग्णसंख्या कमी झाल्याने केडगावची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे. नागरिकांनी काळजी घेऊन सर्व नियमांचे पालन करावे.
-गिरीष दळवी, आरोग्य अधिकारी, केडगाव केंद्र