अहमदनगर : बहुचर्चित अशोक लांडे खूनप्रकरणात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी महापौर संदीप कोतकर याला अखेर सीआयडीने केडगाव हत्याकांडात वर्ग करून घेतले़ कोतकर याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे़केडगाव येथे ७ एप्रिल रोजी राजकीय वादातून संजय कोतकर व वसंत ठुबे या शिवसैनिकांची हत्या झाली होती़ याप्रकरणी संदीप कोतकर याच्यासह ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या गुन्ह्यात आतापर्यंत आठ जणांना अटक करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे़ संदीप कोतकरला केडगाव हत्याकांडात वर्ग करून घेण्याची परवानगी मिळाल्यानंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी त्याला नाशिक कारागृहातून सोमवारी रात्री नगर येथे आणले़ मंगळवारी दुपारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले़यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने अॅड़ सुनील बर्वे यांनी युक्तिवाद केला़ ते म्हणाले, केडगाव हत्याकांड घडले त्या दिवशी संदीप कोतकर हा त्याची पत्नी सुवर्णा व इतर फरार आरोपींच्या संपर्कात होता़ त्यांच्यात नेमके काय संभाषण झाले़ तसेच नाशिक कारागृहातून धुळे येथे जाताना संदीप याने आणखी कुणाशी संपर्क केला़ नाशिक येथे चांगली उपचारपद्धती असताना संदीप धुळे येथे का गेला़ तसेचया गुन्ह्यात कसे कटकारस्थान रचले गेले आदी बाबींचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी़ आरोपीच्यावतीने अॅड़ महेश तवले यांनी युक्तिवाद करत या प्रकरणात पोलिसांनी आधीच पूर्ण तपास केलेला आहे़ त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी देऊ नये अशी मागणी केली़ दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस़एस़ पाटील यांनी आरोपीला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली़संदीपचे डोळे पाणावलेसुनावणी दरम्यान संदीप कोतकरने न्यायालयात हात जोडून सांगितले की, मी न केलेल्या गुन्ह्याची सध्या शिक्षा भोगत आहे़ जेल काय असते हे मला माहित असताना दुसरा गुन्हा करण्याचा विचारही माझ्या मनात येणार नाही़ मला व माझ्या कुटुंबाला या गुन्ह्यात गोवले गेले आहे़ त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी विनंती त्याने न्यायालयात केली़सुवर्णा कोतकर फरारचकेडगाव हत्याकांडाच्या कटात माजी उपमहापौर सुवर्णा संदीप कोतकर हिचा सहभाग असल्याचे सीआयडीने दोषारोपपत्रात नमूद केलेले आहे़ सीआयडीने मात्र अद्यापपर्यंत सुवर्णा हिला अटक केलेली नाही़ अटक न करण्यामागे काय कारण आहे हे न उलगडणारे कोडे आहे़
केडगाव हत्याकांड : संदीप कोतकर सीआयडी कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:37 AM