सन्मतीवाणीज्ञानप्राप्तीची क्रिया ही अखंड चालू असते. ज्ञान हा तिसरा डोळा आहे. तो डोळा उघडा ठेवून अंतरंगातील ज्ञानाचा दिवा प्रकट करा. डोळे हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. डोळे नसतील तर जगातील सौंदर्य पाहता येत नाही. शिक्षित लोक सुध्दा अनेकदा अज्ञानी असतात. ज्ञानपंचमीला सौभाग्यपंचमी असेही म्हणतात. ज्ञानाची जितकी जास्त तुम्ही आराधना कराल तितके सौभाग्य तुम्हाला प्राप्त होईल. ज्ञानाचा दिवा उजळला तर भाग्यप्राप्ती होते. सध्याचे युग बुध्दी विकासाचे आहे. हल्लीची लहान मुले कुशाग्र बुध्दीची आहेत. लहान मुलांच्या बुध्दीचा विकास करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. तसे झाले तर हिच मुले भविष्यात प्रगतीचा कळस गाठतील. केवळ शाब्दिक ज्ञान असणारे व्यक्ती पंडित नसतात. अहंकार हा ज्ञानप्राप्तीमधील एक अडथळा आहे. म्हणूनच ज्यांना ज्ञानप्राप्ती करावयाची असेल त्यांनी अहंकार बाजूला ठेवलाच पाहिजे. ज्ञानप्राप्ती ही कठीण आहे पण ते पचविणे सुध्दा सोपे नाही. समर्पित भावनेनेच ज्ञान मिळविता येते. ज्ञानप्राप्ती करिता आधी मनाची तयारी करावयास हवी. मानसिक तयारी असेल तरच सखोल ज्ञान मिळू शकते. ज्यांच्यापासून आपणास ज्ञान मिळवायचे आहे त्यांचा आदर केला पाहिजे. अध्ययन हा समुद्र आहे. ज्ञान अज्ञानाचा अंधकार दूर करते. ज्ञानाचा दिवा सतत पेटता ठेवा म्हणजे जगातील सौंदर्य पाहता येईल. ज्ञानप्राप्तीचे ध्येय ठेवून जीवनाची वाटचाल करीत रहा. ज्ञानप्राप्तीमुळे जीवनाची दिशा बदलते.
- पू.श्री.सन्मती महाराज.