तिसगाव : सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान म्हणून राज्यभर श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थानचा लौकिक आहे. पौराणिक महती असलेल्या रूढी-परंपरांचा आदर करताना वैज्ञानिक व सार्वत्रिक हिताचा दृष्टिकोन ठेवून कानिफनाथ गड व गावाच्या विकासाला गती देण्याचा मानस आहे, अशी माहिती देवस्थानचे नूतन अध्यक्ष संजय मरकड यांनी ‘लोकमत’ला दिली.
मढी गडावर राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या महिला भाविकांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष शनिवारी दुपारी सुरू करण्यात आला. त्यानिमित्ताने पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. कोषाध्यक्ष राधाकिसन मरकड, सचिव विमल मरकड, सहसचिव विधिज्ञ शिवजित डोके, कार्याध्यक्ष डॉ. विलास मढीकर, विश्वस्त श्यामराव मरकड, रवींद्र आरोळे, भाऊसाहेब मरकड उपस्थित होते.
पर्यटनवृद्धीसाठी मायंबा ते मढी रोपवे, नाथमहात्म्य मालिका निर्मितीसाठी प्रोत्साहन देऊन प्रचार, प्रसार, गडाचे चौफेर असलेल्या विविध ऐतिहासिक बारवा, वेशींचा जीर्णोद्धार व सुशोभिकरण, पूजाविधीचे निर्माल्यांपासून घनकचरा प्रकल्प, पाणीसाठवण तलावनिर्मिती, आंबराई येथील इनामी जमीनक्षेत्रांत स्पर्धेच्या युगास अनुकूल असे भक्तनिवास, अशा ६५ कलमी विकास मुद्यांवर विश्वस्त मंडळ पाच वर्षांत काम करणार असल्याचे मरकड यांनी सांगितले.
आजीवन अन्नदान सभासद योजनेंतर्गत महाप्रसाद सेवा सुरू आहे. विविध विकासकामांसाठी ऑनलाईन देणग्यांची देवस्थानकडे सुविधा आहे. तरीही परिसरांत भाविकांची दिशाभूल करून अन्नदान व बांधकामांच्या नावाखाली काही भोंदू लूट करतात. त्यासाठी भाविकांनी सतर्कता बाळगायलाच हवी, असे आवाहन रवींद्र आरोळे, विधिज्ञ शिवजित डोके यांनी केले. विदेशी पर्यटन व पर्यटकवृद्धीसाठी जनसंपर्क कार्यालय, प्रशस्त वाहनतळ, मढी गडपरिसराच्या जोडरस्त्यांवर स्वागत कमानी, गर्दी नियंत्रणासाठी उड्डाणपूल, यात्रा परिसरांचा हायटेक कृती आराखडा, असे नियोजित विकासाचा दृष्टिकोनही विश्वस्त मंडळाच्या अजेंड्यावर असल्याचा उजाळा याप्रसंगी देण्यात आला. कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड उपस्थित होते.