राळेगणसिद्धी (जि.अहमदनगर) : २०११ च्या दिल्लीतील आंदोलनात सामील झालेले अरविंद केजरीवाल पुढे राजकारणात जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. आता यापुढे आंदोलनात सामील होण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना पुढे राजकारणात जाता येणार नाही. त्यामुळे दुसरा ‘केजरीवाल’ तयार होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.लोकपाल आणि लोकायुक्त यांची नियुक्ती, शेतीमालाला हमीभाव, निवडणूक सुधारणा अशा विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २३ मार्च रोजी शहीद दिनापासून दिल्ली येथे सत्याग्रह करणार आहेत. या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांची भूमिका, जबाबदारी काय असेल या आंदोलनाचे नियोजन व प्रचार व प्रसार त्यांनी कसा करावयाचा? यासाठी राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिर परिसरात महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्त्यांचे मंगळवारी एकदिवसीय शिबीर पार पडले.मी देशातील २२ राज्यात आंदोलनाच्या जनजागृतीसाठी दौरे केले. तेथे सभांना मोठा प्रतिसाद मिळाला असून लाखो लोक आंदोलनाशी जोडले गेले आहेत. हा समाज देशाच्या दृष्टीने एक आशेचा किरण आहे. १८५७ ते १९४७ या काळात लाखो देशभक्तांच्या बलिदानातून आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, स्वातंत्र्यानंतर लोकशाही व्यवस्थेत भ्रष्टाचार, गुंडागर्दी वाढली आहे. सरकार जनतेची तिजोरी लुटत आहे. अलिकडच्या काळात काही करून सत्ता मिळविण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ लागली आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दुष्टचक्र सुरू असल्याचे दिसून येते. सत्ता व पैशांच्या नशेत राजकारणी धुंद झाले आहेत. समाज व राष्ट्राला आपण कुठे घेऊन चाललो आहोत, याचे भान त्यांना राहिले नाही. यामुळे समाज व देशाच्या भल्यासाठी अनेक लोक राजकारणापासून हळूहळू दूर होत आहेत, असेही अण्णा हजारे यावेळी म्हणाले.शिबारीसाठी बालाजी कोमपलवार, अशोक सब्बन, शाम असावा, अल्लाउद्दीन शेख, डॉ. शिवनाथ कुंभारे, सरपंच रोहिणी गाजरे, सुरेश पठारे, दादा पठारे, सुनील हजारे, संजय पठाडे, राजाराम गाजरे, श्याम पठाडे, दत्ता आवारी, अमोल झेंडे, कल्पना इनामदार आदींसह महाराष्ट्रातून ४०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
आता दुसरा ‘केजरीवाल’ तयार होणार नाही - अण्णा हजारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 8:32 PM
२०११ च्या दिल्लीतील आंदोलनात सामील झालेले अरविंद केजरीवाल पुढे राजकारणात जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. आता यापुढे आंदोलनात सामील होण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना पुढे राजकारणात जाता येणार नाही. त्यामुळे दुसरा ‘केजरीवाल’ तयार होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
ठळक मुद्देराज्यातील कार्यकर्त्यांचे राळेगणमध्ये शिबिर आंदोलनात सहभागासाठी राजकारण न जाण्याचं द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र