आॅनलाईन लोकमतटाकळीढोकेश्वर, दि़ २१ - पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना सुविधा मिळत नसून, अनेकदा औषधांचीही वाणवा असते़ त्यामुळे रुग्णांना सरळ बाहेरचा रस्ता दाखविला जातो़ प्रसुतीगृहासह सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ पारनेर तालुक्यात सध्या स्वाईन फ्ल्यूने थैमान घातले असून वाडगाव सावताळ येथील सिंधूबाई रावसाहेब खरमाळे व वासुंदे येथील पंढरीनाथ रामकिसन झावरे यांचा दोन दिवसांच्या अंतराने स्वाईन फ्ल्यूने बळी घेतला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून या घटनेने परिसर हादरला आहे. दोन दिवसात स्वाईन फ्ल्यूने दोन बळी गेल्याने आरोग्य विभागाचा कारभार ऐरणीवर आला आहे. खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिला, लहान बालकांची तपासणी, लसीकरण, साथीच्या आजारांचे रुग्ण तपासणे आदी प्राथमिक उपचार केले जातात. या आरोग्य केंद्रांतर्गत खडकवाडी परिसरातील १० ते १२ गावांचा समावेश आहे. यामध्ये आदिवासी गावांची संख्या मोठी आहे. या केंद्रात प्रसुतीगृहाची व्यवस्था आहे. त्यामुळे परिसरातील गर्भवती महिला मोठ्या प्रमाणावर येथे येतात. या महिला ज्या ठिकाणी तपासणी करतात त्या खोलीत कायम अस्वच्छता असते. सर्वत्र घाणीचे साम्राज्य असल्याने गर्भवती महिला व नवजात बालकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्य केंद्राला रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका आहे. परंतु ही रुग्णवाहिका गेल्या काही दिवसांपासून धूळखात पडून आहे. या रुग्णवाहिकेचे दोन्ही टायर पंक्चर असून ती जागेवर पडून आहे. त्यामुळे ही रुग्णवाहिका रुग्णांच्या दृष्टीने ‘असून अडचण, नसून खोळंबा’ बनली आहे.
खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर
By admin | Published: May 21, 2017 2:46 PM