श्रीगोंदा : नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस असताना राजेंद्र नागवडे यांनी सन २०१९ - २०चा गाळप हंगाम बंद ठेवून कारखान्याची कामगार यंत्रणा स्वत:च्या दोन खासगी कारखान्यांसाठी वापरली. त्यात नागवडे कारखान्याचे २८ कोटींचे नुकसान केले. यावर राजेंद्र नागवडेंनी शिवाजीबापूंच्या स्मारकासमोर खुली चर्चा करावी, असे आव्हान नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
मगर म्हणाले की, सहवीज निर्मितीचा प्रकल्प वेळेवर सुरू केला नाही म्हणून ८० लाखांचे डिपॉझिट जप्त झाले. हरित लवादाची परवानगी नसल्याने ७० लाख दंड भरावा लागला. राजेंद्र नागवडे हे स्व. शिवाजीराव नागवडे यांचे चिरंजीव असले तरी त्यांना कारखाना चालविण्याचे ज्ञान नाही.
कारखान्याचे सहा चालक यांना कशासाठी लागतात? एवढे चालक मुख्यमंत्र्यांकडे तरी आहेत का? असा टोला शेलार यांनी नागवडेंना लगावला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले म्हणाले की, पक्षीय राजकारणात मी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर आहे, उद्याही राहणार. पण कारखान्याच्या बाबतीत मी केशव मगर यांना साथ करणार आहे.
यावेळी जिजाबापू शिंदे, वैभव पाचपुते, नंदुकुमार कोकाटे, बाळासाहेब काकडे, संजय जामदार, अजित जामदार, बापू भोस, नामदेव जठार, डॉ. दत्तात्रय नागवडे, बाळाप्पा पाचपुते, शांताराम भोयटे, रफिक इनामदार आदी उपस्थित होते.
----------
ज्यांना बापूंनी मोठे केले त्यांनीच विश्वासघात केला
श्रीगोंदा : नागवडे घराण्याने ६० वर्षांच्या वाटचालीत जनतेचा विश्वास संपादन केला. बापूंनी काहींना बोटाला धरून राजकारणात आणून कारखान्याची सत्ता ताब्यात दिली. परंतु बापूंचे निधन होताच कारखान्याच्या सत्तेवर डोळा ठेवून विश्वासघात करत त्यांनी विरोधात उडी मारली. त्यामुळे अशा गद्दारांचा कारखाना निवडणुकीत सभासद बुरखा फाडणार आहेत, असा टोला नागवडे साखर कारखान्याचे संचालक ॲड. सुनील भोस यांनी लगावला.
भोस पुढे म्हणाले की, शिवाजीराव नागवडे हयात असताना त्यांनी राजेंद्र नागवडे यांना कारखान्याचे अध्यक्ष केले. त्यांनीही कारखाना चांगला चालवून शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या तुलनेत चांगला भाव दिला. त्यावेळी केशव मगर यांना राजेंद्र नागवडेंना कारखाना चालविता येतो की नाही हे दिसले नाही का?
अण्णासाहेब शेलार हे कधी पंचायत समिती आणि कारखाना संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहात नाहीत. जनमताचा अनादर करतात. ते संस्थेपेक्षा स्वत:ला मोठे समजतात. स्वार्थासाठी आरोप, टिंगलटवाळी करणे, हा त्यांचा धंदा आहे. जनतेच्या हिताचे कोणते काम केले, हे त्यांनी दाखवून द्यावे, असे भोस म्हणाले.
बापूंनी तत्त्वनिष्ठेचे, जनहिताचे राजकारण केले. पण त्यांच्या घराण्यावर घाणेरडे आरोप करून पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना बापूंच्या स्मारकाला स्पर्श करण्याचा अधिकार नाही, असा टोलाही भोस यांनी लगावला.