खर्डा : खर्डा (ता.जामखेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम बंद असल्याने सध्या कारभार तीनच खोल्यांमधून सुरू आहे. त्यावर ३२ गावे अवलंबून असून येथील काही पदे रिक्त असल्याने नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सध्या हे आरोग्य केंद्रच ‘व्हेंटिलेटर’वर आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रावर ५३ हजार लोकसंख्येचा भार आहे. खर्डा, जातेगाव, तेलंगशी, देवदैठण, नायगाव, लोणी, घोडेगाव, पिंपळगाव उंडा, सोनेगाव आदी उपकेंद्र त्या अंतर्गत येतात. रिक्त पदे असल्याने उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात एक आरोग्य सेवक, एक आरोग्य सहाय्यक, एक आरोग्य सहाय्यिका, औषध निर्माता, नायगाव केंद्रांतर्गत एक आरोग्य सेवक, पिंपळगाव उंडा उपकेंद्रांतर्गत आरोग्य सेवक, जातेगाव उपकेंद्र एक आरोग्य सेविका व सोनेगाव उपकेंद्र एक आरोग्य सेविका अशी पदे रिक्त आहेत.
वास्तविक पाहता कोरोना काळात ग्रामीण भागातील सौम्य त्रास असणाऱ्या रूग्णांवर उपचार करणे, गंभीर रूग्णांना संदर्भ सेवेसाठी पुढे पाठविणे, वैयक्तिक स्वच्छता, मास्क वापरण्याबाबत नागरिकांना समुपदेशन करणे, योग, प्राणायाम, समतोल आहाराबाबत मार्गदर्शन करणे. कोरोनामुक्तीनंतर त्या रूग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे व त्यांना उपचार देणे या गोष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून होणे अपेक्षित आहे. मात्र अपुरे मनुष्यबळ व सोयीसुविधा आदींमुळे प्राथमिक आरोग्य केंद्र ‘असून अडचण, नसून खोळंबा’ बनले आहे.
येथे प्रशस्त इमारतीचे २०१९ मध्ये बांधकाम सुरू झाले. मात्र ते काम सध्या बंद आहे. त्यामुळे सध्या तीन छोट्या खोल्यांमधूनच केंद्राचा कारभार चालतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये केवळ दोन वैद्यकीय अधिकारी काम करतात. केंद्रासह उपकेंद्रांमध्ये पूर्ण क्षमतेने कर्मचारी नसल्याने परिसराची आरोग्य सेवा ‘रामभरोसे’ आहे. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवरही उपचार घेणारे रूग्ण, लहान मुले, गर्भवती महिला यांच्या रूग्णसेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. एवढ्या अडचणींना तोंड देत येणाऱ्या इतर रूग्णांना येथील लसीकरणासाठीच्या गर्दीने कोरोना संक्रमण होण्याचा धोका आहे. त्यामुळे याचे नियोजन होणे गरजेचे आहे.
---
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेतून या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ६ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. २०२० च्या पूर्वार्धातच हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे बांधकाम अपूर्णावस्थेत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भातही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या काळात खर्डा भागातील नागरिकांसाठी विलगीकरणाची सोयही लोकप्रतिनिधी व प्रशासनाला करता आली नाही. त्यामुळे खर्डा भागातील मृत्यूदर तालुक्यात सर्वात जास्त ठरला.
- प्रा. राम शिंदे,
माजी मंत्री
-----
मनुष्यबळाची अडचण असल्यामुळे खर्डा आरोग्य केंद्राचे बांधकाम धीम्या गतीने सुरू आहे. आम्ही कोविड सेंटरवर सध्या जास्त लक्ष केंद्रित केले आहे. सध्या कोविड रूग्ण बरे करण्यास आमचे प्राधान्य आहे. कोविड कमी होताच बांधकामावर लक्ष देऊन लवकरच इमारत पूर्ण करू.
-रोहित पवार,
सदस्य, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ
----
२४खर्डा
खर्डा येथील प्राथमिक आराेग्य केंद्राच्या इमारतीचे अपूर्णावस्थेतील इमारत.