गोरख देवकर
अहमदनगर : रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्र जिल्हाभर बरसल्याने यंदा खरीप हंगामात कृषी विभागाने ठेवलेल्या उद्दिष्टाहून अधिक म्हणजेच ११४ टक्के पेरणी जूनमध्येच झाली. शेतकºयांची यंदाही कपाशी, बाजरीलाच पसंती राहिली तर तूर, मूग, सोयाबीनच्या पेºयातही मोठी वाढ झाली.
मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच यंदा मान्सूनपूर्व (रोहिणी नक्षत्र) पाऊस जोरदार बरसला. हा पाऊस जिल्ह्यातील सर्वच भागात झाला. त्यामुळे मशागती करून ठेवलेल्या शेतकºयांनी जून महिन्याच्या सुरुवातीलाच खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. त्यानंतर काही ठिकाणी बाजरी, सोयाबीनचा अपवाद वगळता इतर खरीप पिकांची उगवण चांगली झाली. रोहिणीपाठोपाठ मृग, आर्द्रा नक्षत्रही चांगले बरसले. सध्या गावोगाव पिकांच्या आंतरमशागतीची कामे सुरू आहेत.
यंदा कृषी विभागाने खरीप हंगामात उसाशिवाय ४ लाख ४७ हजार ९०४ हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवले होते. ते पूर्ण होऊन ५ लाख १४ हजार ५९० हेक्टर क्षेत्रावर जूनमध्येच खरिपाची पेरणी पूर्ण झाली. सरासरीच्या ११४ टक्के पेरणी झाली. यात सर्वाधिक क्षेत्रावर १ लाख ११ हजार २ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. पारनेर, संगमनेर, पाथर्डी तालुक्यात बाजरीचा पेरा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यापाठोपाठ १ लाख १० हजार ९३३ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यातच कपाशी लागवड अधिक आहे.
मुगाची ५१ हजार ५२५ हेक्टरवर पेरणी झाली असून पारनेर, नगर तालुक्यात सर्वाधिक पेरा आहे. शेतकºयांनी सोयाबीनची ६८ हजार ५७८ हेक्टरवर पेरणी केली आहे. त्याला कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्यातील शेतकºयांनी अधिक पसंती दिली आहे. वाटाण्याचा नेहमीप्रमाणे पारनेर तालुक्यातच सर्वाधिक पेरा असून त्याचे क्षेत्र ४ हजार ५५७ हेक्टर आहे.----------------चवळी, हुलग्याची अत्यल्प पेरणीचवळी, हुलग्याची पेरणी अगदीच नगण्य आहे. चवळीची ५७ हेक्टरवर तर हुलग्याची ४३१ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. मटकीचीही अवघ्या ६५२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.