अहमदनगर : मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीसाठी बाधित शेतक-यांना आतापर्यंत सुमारे ४०० कोटींचे वाटप झालेले आहे. मात्र यातून काही कारणास्तव अनुदान न मिळालेल्या शेतकºयांना आता शासनाने अनुदान मंजूर केले असून त्यापोटी जिल्हा प्रशासनाकडे ४२ कोटी ९० लाख रूपये प्राप्त झाले आहेत. अल्प पावसामुळे मागील वर्षीचा खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे दुष्काळाने बाधित झालेल्या शेतकºयांना मदत करण्यासाठी नगर जिल्ह्यात शासनाकडून दोन टप्प्यात ४७२ कोटी रूपये प्राप्त झाले होते. दोन टप्प्यात हे अनुदान जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसीलदारांकडे वर्ग केले. सर्व तहसीलदारांनी ३१ मार्च २०१८ अखेर सुमारे ४०० कोटी रूपये शेतक-यांच्या खात्यावर जमा केले. परंतु यातील काही शेतक-यांना तांत्रिक कारणामुळे अनुदान मिळू शकले नाही. यात काही शेतक-यांची बँक खातीच नव्हती, तर काही शेतकºयांची खाती जुळत नव्हती. पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांतील बरेचशे शेतकरी ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यात गेल्याने त्यांचे अनुदान वाटप होऊ शकले नाही. परिणामी मार्चअखेर जिल्हा प्रशासनाला ७२ कोटी रूपये शासनाकडे समर्पित करावे लागले. त्यानंतर प्रशासनाने वंचित राहिलेल्या शेतक-यांची माहिती पुन्हा गोळा करून त्यांच्यासाठी ४२ कोटी ९० लाख ७९ हजार रूपये अनुदानाची मागणी शासनाकडे फेब्रुवारी २०१९ मध्ये केली होती. ती रक्कम आता प्राप्त झाली आहे. यात पारनेर, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, नेवासा, संगमनेर या सहा तालुक्यांतील शेतक-यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक १६ कोटी ५३ लाख अनुदान पारनेर, तर १४ कोटी ७८ लाख रूपये पाथर्डी तालुक्यासाठी आले आहे.
‘राहिलेल्यां’ना मिळणार खरीप अनुदान; ४२ कोटी प्रशासनाला प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 6:58 PM