अहमदनगर : महाराष्ट्र वरिष्ठ महिला क्रिकेट संघात आश्वी (ता़ राहाता) येथील पूनम खेमनरचा समावेश झाला असून, रायपूर येथील टी-२० स्पर्धेत ती खेळणार आहे. बीसीसीआयअंतर्गत खेळविल्या जाणाऱ्या वरिष्ठ महिला टी-२० लीग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ नुकताच निवडण्यात आला़ या संघात एस़ बी़ पोखरकर, एस़ ए़ लोणकर, एम़ डी़ सोनावणे, के ़ पी़ नवगिरे, ए़ ए़ पाटील, एम़ ए़ आघाव, एम़ आऱ माग्रे, पूनम खेमनर, पी़ बी़ गारखेडे, एस़ आऱ माने, सी़ डी़ चार्मी, डी़ पी़ वैद्य, एस़ एस़ शिंदे, टी़ एस़ हसबनीस, यु़ ए़ पवार यांचा समावेश आहे़ ही स्पर्धा २० फेबु्रवारी ते १ मार्च दरम्यान रायपूर (छत्तीसगड) येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळविण्यात येत आहे़ स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहा साखळी सामने खेळणार आहे़ महाराष्ट्राचा पहिला सामना २० फेबु्रवारी रोजी गुजरात विरोधात होईल़ त्यानंतर २१ ला आसाम, २३ ला छत्तीसगड, २४ ला नागालँड, २७ ला हरियाणा, १ मार्चला सिक्कीम या संघाविरोधात महाराष्ट्राचे साखळी सामने होणार आहेत. पूनम खेमनर २०१५ पासून महाराष्ट्र संघाकडून वयोगटातील स्पर्धा खेळत होती़ आता ती महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघाकडून खेळत आहे़ उजव्या हाताची फलंदाज व गोलंदाज असलेल्या पूनमने यापूर्वी अनेकदा शतकी खेळी केलेली आहे़ घरातून क्रिकेटसाठी कोणतेही पोषक वातावरण नव्हते़ ती प्रथम जेव्हा निवड चाचणीसाठी उपस्थित राहिली, त्यावेळी तिच्याकडे क्रिकेट किट नव्हती़ दुस-या मुलीची क्रिकेट किट घेऊन ती खेळली अन् स्वत:ला सिद्ध केले़ पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र संघाकडून खेळतानाही पूनमने दर्जेदार खेळ केला आहे़
महाराष्ट्राच्या संघात नगरची पूजा खेमनर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:46 PM