जामखेड : ऊस तोडणी व वाहतुकीसाठी पाच लाख रुपये ठेकेदाराकडून उचल घेऊन प्रत्यक्षात उचलीप्रमाणे ट्रॅक्टर व ऊसतोडणी मजूर न दिल्याने वाद झाला. यावरुन तालुक्यातील सातेफळ येथील एका व्यक्तीचे अपहरण करून घातपात केल्याची फिर्याद मंगळवारी रात्री नातेवाईकांनी जामखेड पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. याबाबत जामखेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी गयाबाई आप्पासाहेब भोसले (वय २५, रा. सातेफळ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी अजित दिलीप सदाफुले व अर्जुन ( काळू) दिलीप सदाफुले रा. सातेफळ यांनी अपहरित व्यक्ती बप्पासाहेब मारूती भोसले यांच्या मध्यस्थीने संजय बाजीराव मुंडे (रा.अंमळनेर, ता. पाटोदा, जि. बीड) यांच्याकडून शरयू साखर कारखाना फलटण (जि. सातारा) येथे ऊस तोडणी व वाहतुकीसाठी पाच लाख रुपये उचल घेतली होती. प्रत्यक्षात उचलीप्रमाणे ट्रॅक्टर व ऊसतोडणी मजूर न दिल्याने ३० आँक्टोबर रोजी गावात वाद झाला. बोलेरो जीप क्रमांक एम. एच. ४५, - ८२८३ या जीपने शहादा (जि. धुळे) येथे जायचे आहे असे सांगून पिडीताचे अपहरण करुन घातपात केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी व आरोपी हे एकाच गावात व जवळ जवळ राहणारे आहेत. यातील आरोपींनी मागील काळात यातील अपहरित यांच्या मध्यस्थीने शरयू साखर कारखाना येथे ऊस तोड व वाहतुकीसाठी ट्रॅक्टर व टोळी पुरवण्यासाठी संजय बाजीराव मुंडे या ठेकेदाराकडून पाच लाख रुपये उचल घेतली होती. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे करत आहेत. |
ऊस तोडणीच्या उचलीवरुन केले अपहरण; घातपात केल्याची नातेवाईकांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 1:42 PM