श्रीगोंदा : औरंगाबाद येथील एका विवाहित महिलेने आपल्याशी लग्न करावे म्हणून चक्क तिच्या सहा वर्षाच्या मुलाचे मारुती कारमधून अपहरण केले. या प्रकरणी सागर गोरख आळेकर( रा. श्रीगोंदा) याला श्रीगोंदा पोलिसांनी पारगाव फाट्यावर नाकेबंदी करुन पकडले. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली.
सागर आळेकर यांच्या ताब्यातून सहा वर्षीय मुलाची सुटका केली आणि आई वडीलांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर आळेकर याच्या विरोधात एम.आय.डी. सी. वाळुजनगर औरंगाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समजलेली अधिक माहिती अशी, अपहरण केलेल्या मुलाच्या आईने आपल्याशी लग्न करावे म्हणून सागर आळेकरने औरंगाबादला जाऊन मुलाच्या वडिलांना धमकावले आणि एम.एच. 42 ए. एच. 9655 या क्रमांकाच्या मारुती स्विफ्टमधून बजाजनगर औरंगाबाद येथुन मुलाचे अपहरण केले.
मुलाच्या वडिलांनी आरोपीच्या गावाचा विचार करून नगर व श्रीगोंदा पोलिस स्टेशन कल्पना दिली.
पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर पोलिस काॅस्टेबल रमेश जाधव अंकुश ढवळे किरण बोराडे दादा टाके प्रकाश मांडगे गोकुळ इंगवले यांनी पारगाव फाट्यावर नाकेबंदी करुन सागर आळेकर याला पकडले. त्याची स्विफ्ट कार जप्त केली आहे.