नेवासा : ऊस तोडणीसाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना गुरुवारी दुपारी नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव शिवारात घडली. याप्रकरणी दोघा जणांविरोधात नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अशोक एडबा गोरे (वय २४, रा. रेल्वे स्टेशन मुकुंदवाडी, जि.औरंगाबाद) व सचिन रामकिसन चव्हाण (रा. वजूर ता. मानवत) ही गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बेलपिंपळगाव येथे संगमनेर येथील यू-टेक साखर कारखान्याची ऊसतोड चालू आहे. त्यासाठी दहा दिवसांपासून कोप्या करून काही कुटुंब येथे राहतात. पीडित मुलगी व तिची आई, वडील, भाऊ सकाळी ऊस तोडणीसाठी गेले होते. दुपारी जेवणानंतर अल्पवयीन मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे तिला उसाबाहेर ठेऊन हे कुटुंब ऊस तोडणीला गेले.दरम्यान, काही वेळानंतर मुलीच्या आईने मुलीला आवाज दिला. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने शोध घेतला असताना ती आढळून आली नाही. पीडित मुलीच्या भावाने दुरचा नातेवाईक असलेला अशोक गोरे, मित्र सचिन चव्हाण याच्यासह आला. या दोघांनी बहिणीला दुचाकीवर बसवून पळवून नेले. त्यांचा पाठलाग केला असता ते नेवाशाकडे पळून गेले, असे त्याने सांगितले.अशोक गोरे नातेवाईक असल्याने तो नेहमी घरी येत असे, असे मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.