शिर्डी : साईबाबांना अनेक भक्त पैसे, सोने, चांदी असे दान देतात. मात्र बी़ शिवप्रिया या तरुण व उच्चशिक्षित भाविक महिलेने शताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिर्डीतील कोणाही गरजूला चक्क आपली किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे़३५ वर्षीय बी़ शिवप्रिया हिने गेल्या आठ वर्षांत शिर्डीला साडेतीनशेहून अधिक वेळा भेट दिली आहे. ती मूळ चेन्नईची असून सध्या पुण्यात टाटा मोटर्समध्ये संशोधन विभागात व्यवस्थापक आहे. चाळीसहून अधिक वेळा संस्थान रक्तपेढीत रक्तदान करणाऱ्या शिवप्रियाने संस्थान रुग्णालय व अन्य विभागाला अनेक देणग्याही दिल्या आहेत.किडनी घेणारी व्यक्ती शिर्डीचीच व ‘ओ’ रक्तगटाची तरुण असावी, तसेच तिच्यावर कुटुंब अवलंबून असावे किंवा ती व्यक्ती शिक्षण घेत असावी अशा अटी शिवप्रियाने ठेवल्या आहेत. अनेक जण तिच्याकडे संपर्क करत असून अटीत बसणाºया गरजू रुग्णांच्या नावाच्या चिठ्या साई समाधीवर टाकून संबंधित व्यक्तीची निवड करण्यात येणार आहे.साईबाबांच्या चरणी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे दान अर्पण केले जाते़ दरवर्षी या दानात वाढ होते़ या वर्षी सुमारे शंभर कोटी रुपयांचे दान साईचरणी अर्पण करण्यात आले़ दरम्यान, शिवप्रिया हिने केलेल्या दानाचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे़ तिच्याप्रमाणे इतरांनीही पुढाकार घेऊन अशा प्रकारे दान करावे, अशी आशाही व्यक्त केली जात आहे़ कारण गरजूंना मदत करणे हीच खरी ईश्वर सेवा असते, असे बोलले जाते़ त्याचाच आदर्श इतरांनीही घ्यायला हवा़
साईचरणी करणार चक्क किडनीदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 3:31 AM