अहमदनगर : मनपातील २०० कोटींच्या रस्ते घोटाळ्यातील बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर १ जून रोजी आत्मदहन करणार असल्याचा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी इशारा दिला होता. मात्र त्यापूर्वीच बुधवारी रात्री उशिरा काळे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक सुरू असतानाच तोफखाना पोलिसांनी काळे यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली.
त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी केली होती. काळे यांच्या 'क्षितिज' बंगल्यावर सुरू असणाऱ्या बैठकीत ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक अध्यक्ष अनिस चुडीवाला, माजी नगरसेवक संजय झिंजे, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, मनसुख संचेती, युवक अध्यक्ष प्रवीण गीते, सुजित क्षेत्रे, उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, कामगार नेते विलास उबाळे, युवक उपाध्यक्ष आकाश अल्हाट, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष प्रणव मकासरे, युवक सरचिटणीस आनंद जवंजाळ, सरचिटणीस अभिनय गायकवाड, सावेडी विभाग प्रमुख अशोक शिंदे आदींसह प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी पोलिसांनी काळे यांना आत्मदहन आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र काळे यांनी माघार घेण्यास नकार दिल्यामुळे शेवटी पोलिसांनी त्यांना कार्यकर्त्यांसह पोलिस स्टेशनला नेले.
दरम्यान बुधवारी दुपारी मनपात उपायुक्तांच्या दालनात झालेली चर्चेची फेरी निष्फळ ठरली होती. त्यानंतर सायंकाळी पुन्हा पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी मध्यस्थी करत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तोही प्रयत्न निष्फळ ठरला. रात्री काळेंना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी मनपा उपायुक्त तथा या प्रकरणाचे चौकशी अधिकारी कुऱ्हे, शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता निंबाळकर यांना पाचारण करत पोलीस स्टेशनमध्ये काळे व मनपा अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा चर्चा घडवून आणली. यावेळी काळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट झाली आहेत. जनतेच्या पैशांची लूट झाली आहे. रस्ते चार महिन्यात गायब होत आहेत. काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण केले जात आहे, असे म्हणत काळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार लेखी आश्वासन देत बनावट टेस्ट रिपोर्ट प्रकरणी दोषींवर दीड महिन्यांच्या आत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच तांत्रिक बाबींबाबत बनावट कागदपत्रांच्या कामांचे सक्षम तांत्रिक प्राधिकरणाकडून चौकशी करून चौकशीअंति निकृष्ट कामे करणाऱ्या दोषींवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन काळे यांना देण्यात आले.त्यानंतर काळे यांनी आत्मदहन आंदोलन स्थगित करत असल्याची काँग्रेसच्या वतीने घोषणा केली.