अहमदनगर : शेतकऱ्यांना पीकपाणी, बदलत्या हवामानाची माहिती देण्यासाठी विविध कंपन्यांची विकसित केलेले ‘किसान ॲप्स’ वराती मागून घोडे ठरले आहेत. वादळ वारे, पाऊस येऊन गेल्यानंतर या ॲपवरून माहिती दिली जात आहे. काही माहितींमध्येही तफावत आढळून येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे ॲप्स वापरणे बंद केले आहे.
जिल्ह्यात अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत. विविध प्रकारे माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये केंद्र, राज्य सरकारचे कृषीविषयक विभाग, विविध खासगी कंपन्यांच्या ॲपचाही समावेश आहे. हे ॲप बऱ्याचदा ‘किसान ॲप’ म्हणूनही ओळखले जातात. अलीकडच्या दिवसांत अनेक शेतकऱ्यांना या ॲपबद्दल विचित्र अनुभव आले आहेत.
पीक काढणीबद्दल कालावधी निघून गेल्यानंतर संदेश पाठविले जात आहेत. कीडरोग नियंत्रणासाठी दिलेली माहिती अपुरी असते. जनावरांचे आजार, पिकांचा बचाव याबद्दलही अपुरी माहिती असते. हवामानाच्या अंदाजासाठी काही शेतकरी ॲपचा वापर करतात. आपत्ती येऊन गेल्यानंतर काही ॲपवरून इशारे दिले जातात. दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांना या ॲपविषयी माहितीदेखील नाही. त्याबाबत कृषी विभागाकडून जनजागृतीही केली जात नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत कृषी अधिकारी कार्यालयाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना दूरध्वनी संपर्काचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
---
विविध ॲपवर काय माहिती मिळते..
१) हवामानाचा अंदाज देण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आल्याचे सांगितले जाते.
२) शेतीशी संबंधित विविध विषयांवर यावर मार्गदर्शन केले जाते.
३) विविध पिकांवर रोगांचा होणारा प्रादुर्भाव, त्यावरील उपाय सुचविले जातात.
४) जिल्ह्यात होणारा हवामानातील बदल, आपत्ती याची माहिती दिली जाते.
५) सरकारच्या काही योजनांची माहिती देण्याचा यावरून प्रयत्न केला जातो.
६) यातील अनेक ॲपवर माहिती अपडेट नसते, त्यामुळे शेतकरी नाराज होतात.
----
शेती, हवामानाबाबत मार्गदर्शन करणारे अनेक ॲप बाजारात उपलब्ध आहेत. पिकांची, हवामानाची माहिती चांगल्या पद्धतीने मिळावी या हेतूने मी एक ॲप डाऊनलोड केले होते. त्यातून सुरुवातीला चांगली माहिती मिळायची. मात्र, कालांतराने त्यामध्ये फारसी अपडेट माहिती मिळेनासी झाली. विशेषत: हवामान बदलाबाबत अपडेट माहिती मिळत नव्हती. त्यामुळे मी ते ॲप डिलिट करून पुन्हा कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतीमध्ये प्रयोग करीत आहे.
-संदीप शिंदे, श्रीगोंदा
-----
मी शेतीत नवनवीन प्रयोग करतो. त्यामुळे पेपर वाचनासह काही ठिकाणी भेटी देतो व शेतीबाबत अधिकाधिक माहिती घेतो. अशाच एका ठिकाणी एका प्रतिष्ठित कंपनीच्या प्रतिनिधीने ‘किसान ॲप’ डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार ॲप डाऊनलोड केले. त्या प्रतिनिधीने ॲपमध्ये सांगितल्याप्रमाणे फिचर्स नव्हते. यामध्ये शासकीय योजनांची माहिती मात्र होती. हवामान अथवा पिकांबाबतच्या माहितीमध्ये काही प्रमाणात तफावत आढळून येत होती. त्यामुळे मी नंतर ॲप वापरणे सोडून दिले.
-भाऊ शेलार, श्रीगोंदा