या यात्रेच्या माध्यमातून अहमदनगरसह संपूर्ण महाराष्ट्रातील युवक-युवती शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी दिल्लीला धडकणार आहेत. हुतात्मा स्मारकात चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून व त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सभा घेण्यात आली. यावेळी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्य अध्यक्ष विराज देवांग, ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे राज्य सचिव संतोष खोडदे, अविनाश दोंदे, फैजान अन्सारी, दीपक शिरसाठ, कार्तिक पासळकर, कॉ. सुभाष लांडे, भैरवनाथ वाकळे, फिरोज शेख, समृद्धी वाकळे, अरुण थिटे, अमोल चेमटे, राजू नन्न्वरे आदींसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
विराज देवांग म्हणाले की, भांडवलदारांचे सरकार सत्तेवर असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार सुरू आहे. नैतिकता विकून सरकार आपले धोरण राबवीत आहे. या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तिन्ही काळे कायदे रद्द करण्याबाबत जागृती करण्यात येत आहे. महाराष्ट्रातून निघालेल्या ही किसान पुत्र संघर्ष यात्रा मुंबईत एकवटणार असून, ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीला रवाना होणार आहे.
------
फोटो - ०६किसान पुत्र यात्रा
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघालेली किसान पुत्र संघर्ष यात्रा हुतात्मा स्मारक येथील चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळी दाखल झाली.