सुदाम देशमुख, अकोले ( जि. अहमदनगर): शेतीमालाला भाव मिळावा या व इतर मागण्यांसाठी किसान सभेतर्फे अकोले ते लोणी येथील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातील शेतकरी सकाळपासूनच अकोले येथे आलेले आहेत. शेतकऱ्यांनी आपापल्या भाकरी-ठेचा खाऊन दुपारी विश्रांती घेतली. तीव्र उन्हामुळे हा लॉग मार्चचे संध्याकाळी प्रस्थान होणार आहे. रात्री हे सर्व शेतकरी, शेतमजूर पायी चालणार आहेत. तीन दिवसांनी हा मोर्चा लोणी येथील विखे पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहे.
दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि किसान सभेचे प्रमुख डॉ. अजित नवले यांची मंत्रालयामध्ये बैठक झाली. परंतु ही बैठक म्हणजे केवळ फार्स होता. इतर खात्याचे मंत्री बैठकीला अनुपस्थित होते. त्यामुळे सरकारला या शेतकऱ्यांच्या मागण्यांचं कोणतेही गांभीर्य नाही, असा आरोप करीत डॉ. अजित नवले यांनी लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आज या मोर्चाची तयारी पूर्ण झाली.
दरम्यान पोलिसांनी या लॉंग मार्चला कोणतीही परवानगी दिलेली नाही. असे असले तरी पोलीस कर्मचारी हे शेतकऱ्यांचीच पोर असल्यामुळे ते आम्हाला पुढे जाऊ देतील असा विश्वास अजित नवले यांनी व्यक्त केला आहे.