श्रीरामपूर : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी येथील तहसील कार्यालयावर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.
श्रमिक शेतकरी संघटना व लाल निशाण पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यात श्रमिकचे प्रदेशाध्यक्ष कॉ. राजेंद्र बावके, जीवन सुरुडे, मदिना शेख, शरद संसारे, राहुल दाभाडे, अजय बत्तीसे, मिलिंद चक्रनारायण, संतोष केदारी आदी सहभागी झाले होते.
यावेळी बावके म्हणाले, शेतकरी संघटनांशी चर्चा न करता घाईघाईने कृषी कायदे करण्यात आले. संसदेत चर्चा केली गेली नाही. कायद्यांविरूद्ध तीन महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शांततेने व घटनात्मक मार्गाने आंदोलन सुरू आहे. यात तीनशेहून जास्त शेतकरी शहीद झाले. मात्र सरकार चर्चा करायला तयार नाही. लोकशाही प्रक्रियेला धरून सरकारची भूमिका नाही. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन सुरू राहणार आहे.
यावेळी कृषी कायदे तत्काळ रद्द करा, नवीन वीजबिल कायदा २०२० रद्द करा, सरकारी उद्योग व बँकांचे खासगीकरण रद्द करा, कामगार विरोधी बिले मागे घ्या या मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले.
आंदोलनात दीपक शेळके, भारत जाधव, अस्लम शेख, संदीप राखपसरे,अमोल मरसाळे,आकाश झिगारे, निलेश जाधव, किरण शेळके आदी सहभागी झाले होते.
---------