अहमदनगर: महापालिकेतील स्वीकृत सदस्य पदासाठी राजकीय पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या खेचाखेचीत भाजप सध्या आघाडीवर आहे. माजी नगरसेवक किशोर डागवाले व सुवेद्र गांधी यांच्यातच स्पर्धा लागली आहे.
किशोर डागवाले हेही गांधी गटाचेच आहेत. माजी खासदार दिलीप गांधी हे शहराध्यक्ष असताना डागवाले उपाध्यक्ष होते. भैय्या गंधे अध्यक्ष झाल्यावर डागवाले हे भाजपपासून तसे चार हात लांबच राहिले आहेत. स्वीकृतचा विषय आल्यावर मात्र डागवाले व सुवेद्र गांधी यांच्यातच स्पर्धा लागली आहे.
माजी खासदार दिलीप गांधी यांच्याकडे सध्या कोणतीच पदे नाहीत. म्हणून त्यांचे पुत्र सुवेद्र गांधी यांना स्वीकृतसाठी माजी खासदार गांधी यांचा आग्रह आहे. शिवाय गांधी यांना महापालिकेत एण्ट्री द्यायची नाही, असा चंग भाजपच्या काही मंडळीनी बांधला आहे. त्यामुळे स्वीकृतचे भाजपमधील हे प्रकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे गेले आहे. आज दुपारपर्यंत पाटील हे स्वीकृतसाठी नाव जाहीर कळणार आहेत.
दरम्यान, आयुक्तांकडे नाव देण्याचा अधिकार पक्षाच्या गटनेत्यांना असतो. भाजपच्या गटनेत्या या सध्या उपमहापौर मालनताई ढोणे आहेत. ढोणे हे गांधी गटाचे असल्याने ते आपले नाव सूचवतील की नाही याची शंका डागवाले यांना आहे. त्यामुळे डागवाले यांनी राष्ट्रवादीत जाऊन स्वीकृत पद पदरात पाडून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
भाजपमध्ये घोडेबाजार भाजपमध्ये सध्या स्वीकृतसाठी घोडेबाजार सुरू आहे. त्यामुळे आपल्याला स्वारस्य नसल्याचे डागवाले सांगत आहेत. यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शहराध्यक्ष भैय्या गंधे नॉट रिचेबल आहेत. पण डागवाले यांनी पक्षाच्या विरुद्ध वक्तव्य केल्याने त्यांचा हा शिस्तभंग ठरू शकतो. तसेच दुसरीकडे राष्ट्रवादीकडे जाण्यासाठी त्यांचा मार्ग मोकळा होणार का? हे सभेत दिसून येणार आहे.