श्रीगोंदा : कोळगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदासाठी बुधवारी (दि.२२) निवडणूक होणार आहे. उपसरपंचपदासाठी विरोधी गटाकडून माया मेहत्रे यांचे नाव आघाडीवर असून, सत्ताधारी गटाने विरोधी गटातील सारिका नितीन मोहारे या सदस्याला उपसरपंचपदाची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उपसरपंचपदावरून चांगलीच रस्सीखेच हाेण्याची शक्यता आहे.
कोळगावच्या सरपंच वर्षा काळे या हेमंत नलगे गटाच्या आहेत. मात्र, ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती भय्या लगड यांचे बहुमत आहे. त्यामुळे उपसरपंचपद त्यांच्या गटाकडे आहे.
भय्या लगड यांनी दरवर्षी एका सदस्याला उपसरपंचपदाची संधी देण्याचा पायंडा पाडला आहे. यापूर्वी शरद लगड, नितीन नलगे, अमित लगड यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला. त्यामुळे उपसरपंचपद निवडीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली.
सध्या भय्या लगड गटाचे नऊ सदस्य आहेत. हेमंत नलगे गटाचे सात सदस्य आहेत. यामध्ये लगड गटाने नलगे गटाच्या कोमल मोरे यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यावर नलगे गटाने उपसरपंचपदाची सारिका मोहारे यांना ऑफर दिली. मात्र, कोमल मोरे यांच्याबाबत जिल्हाधिकारी काय फैसला करतात? यावर ऐनवेळी गणित ठरू शकते. मोहारे हे कुकडीचे माजी उपाध्यक्ष विश्वास थोरात, नितीन डुबल यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे निवडणुकीत रस्सीखेच होणार आहे.