अहमदनगर : नगरमध्ये आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत कोल्हापूर संघाने ८२८ गुण मिळवत सांघिक विजेतेपद पटकावले आहे. तर ५०५ गुणांसह नगरला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.अहमदनगर जिल्हा जलतरण संघटना व महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. कॅप्टन गजानन चव्हाण स्मृतीनिमित्त ४५ वी कुमार-कुमारी तसेच ३५ वी किशोर - किशोरी गट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. वाडिया पार्क येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील ६०० खेळाडू सहभागी झाले होते. फ्री स्टाईल, बेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय, मिडल रिले, डायव्हिंग, वॉटर पोलो अशा विविध प्रकारात ही स्पर्धा झाली. सांघिकमध्ये प्रथम क्रमांक कोल्हापूर (८२८ गुण), व्दितीय क्रमांक नाशिक (५४७), तृतीय क्रमांक नागपूर (५२७) तर चतुर्थ क्रमांक अहमदनगरला (५०५) मिळाला. गट एकमध्ये मुलांमध्ये अनुज कुट्टीर, मुलींमध्ये आभा देशमुख, गट दोनमध्ये मुलांमध्ये विनायक कुवर, मुलींमध्ये अश्मी देसाई, गट क्रमांक तीनमध्ये मुलांमध्ये यशराज चौगुले, मुलींमध्ये अनुष्का पाटील, गट क्रमांक चारमध्ये मुलांमध्ये शार्दूल घाडीगावकर, मुलींमध्ये श्रावणी गडाख यांनी सुवर्णपदके पटकावली.विजेत्यांना विविध पदके प्रदान करण्यात आली़ यावेळी राज्य जलतरण संघटनेचे सचिव आबा देशमुख, खजिनदार राजेंद्र पालकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मार्गदर्शक रामदास ढमाले, डॉ. विश्वजीत चव्हाण, प्रा. रावसाहेब बाबर, बापू गायकवाड, संजय साठे, सतीश झेंडे, प्रा. संजय धोपावकर, अभिजित चव्हाण, विलास खिलारी आदी उपस्थित होते.