सकारात्मक भूमिका घेत कोल्हे गटाचे नेते पराग संधान व सेना, भाजपच्या नगरसेवकांनी मंगळवारी (दि. २१) नगराध्यक्ष वहाडणे यांची भेट घेत सकारात्मक चर्चा करून शहर विकासासाठी याचिका मागे घेत तडजोडीचा निर्णय घेण्यात आला.
वहाडणे म्हणाले की, कोपरगाव शहरातील विकासकामे व्हावीत, यासाठी एकमेकांवरील आरोप- प्रत्यारोप बंद करून उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी, असे जाहीर आवाहन मी केले. त्याला कोल्हे गटानेही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याच विषयावर मंगळवारी नगर परिषद कार्यालयातील माझ्या दालनात कोल्हे गटाचे नेते पराग संधान व आजी माजी पदाधिकारी यांचेशी अतिशय खेळीमेळीचे वातावरणात साधक-बाधक चर्चा होऊन, शंकांचे निरसन करून स्थगिती घेणाऱ्यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून स्थगिती उठवून घ्यावी असे ठरले. त्यानंतर नगर परिषदेतील सर्व गटनेते, नगर परिषद बांधकाम अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता या पाच सदस्य असलेल्या समितीने संबंधित कामे दर्जेदार करून घ्यावीत व काटेकोरपणे मोजमाप घेऊन देयके अदा करावीत, असे ठरले.
पराग संधान म्हणाले की, शहराच्या विकासाच्या २८ कामासाठी नगराध्यक्ष वहाडणे यांनी सकारात्मक साद घातली होती. त्यावर आमचे नेते बिपिन कोल्हे, स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनानुसार या कामावर कामासंदर्भात काही मतभेद होते, त्यावर साधकबाधक चर्चा होऊन सर्व कामे करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. मुळात आमचा या कामांना कधीच विरोध नव्हता; मात्र काही नतद्रष्ट लोकांनी गैरसमज पसरवून शहरभर चर्चा केली. लवकरच न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेऊन सर्वच कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण केली जातील.
दरम्यान, गेल्या आठ महिन्यांपासून २८ कामांच्या मुद्यावरून शहरातील राजकारण ढवळून निघत शहरवासीयांसाठी मनोरंजन ठरलेल्या या विषयाला मात्र झालेल्या तडजोडीमुळे पूर्णविराम मिळाला आहे; परंतु आता पुन्हा नेमका कोणता नवीन विषय सुरू होते, याकडेच शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.