पुणतांबा : आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभेत मोठा संघर्ष केला. त्याचा मी साक्षीदार आहे. कोल्हे यांनी केलेली कामे ही विकासाची बुलेट ट्रेन आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची सोमवारी पुणतांबा येथे जाहीर सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक गंगाधर चौधरी हे होते. यावेळी मुनगुंटीवार पुढे म्हणाले, मी चंद्रपूरहून कोल्हे यांचे विकास काम सांगण्यासाठी आलो आहे. तुम्ही पुन्हा आमदार कोल्हेतार्इंच्या पाठिशी उभा रहा. आता यापुढे त्या एकट्या नसतील. त्यांच्याबरोबर अर्थमंत्री, मुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील असतील. यामुळे पुन्हा आमदार कोल्हे यांना साथ द्या. मीे, माझा पुतण्या, नातू असा घराणेशाहीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा आरोप करीत मुनगुंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका केली. यावेळी आमदार कोल्हे यांनी पुणतांबा येथे केलेल्या विकास कामांचा आढावा मांडला. यापुढेही विकासाची गंगा पुढेच चालू राहील, असे त्यांनी सांगितले.
मतदारसंघाच्या विकासासाठी कोल्हेंचा विधानसभेत संघर्ष-मुनगुंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 5:14 PM