अरुण वाघमोडे । अहमदनगर : कर्जत येथील उपकारागृहाचे छत्र कापून तीन दिवसांपूर्वी पाच आरोपी फरार झाले. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील उपकारागृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील सर्वच उपकारागृहांची दयनीय अवस्था आहे. उखनलेल्या भिंती, मोडकळीस आलेल्या खिडक्या आणि तुटलेले कौलारु अशा अवस्थेत उभ्या असलेल्या या कारागृहात आरोपी कसे कैद राहणार? असा प्रश्न आहे. नगर शहरात एक जिल्हा कारागृह तर तालुकास्तरावर बारा उपकारागृह आहेत. बहुतांशी उपकारागृहांच्या इमारती या इंग्रजांच्या काळातील आहेत. त्यामुळे या ठिकाणी कैदी ठेवणे योग्य नाही़ नगर येथील कारागृहाची क्षमता ६३ कैद्यांची आहे़. या कारागृहात मात्र नेहमीच तीन ते चार पट जास्त कैदी ठेवले जातात. सध्या या ठिकाणी १६८ कैदी आहेत. येथे जागा उपलब्ध होत नसल्याने गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तालुकास्तरावरील जुनाट झालेल्या कारागृहात ठेवले जात आहे. आरोपी येथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. वर्षभरापूर्वी कोपरगाव येथील उपकारागृहातील सतरा कैद्यांनी बराकीत सुरंग खोदून पळून जाण्याचा प्रयत्न केल होता. जिल्हा कारागृह तुरुंग प्रशासनाच्या अंतर्गत येते तर इतर बारा उपरागृह हे महसूल प्रशासनाच्या अंतर्गत येतात. या इमारतींची डागडुजीची जबाबदारी महसूल प्रशासनाची आहे तर येथील सुरक्षेची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे. राज्यात नगर जिल्ह्यात सर्वाधिक बारा उपकारागृह आहेत. जिल्ह्यातील पारनेर, कर्जत, नेवासे, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव, जामखेड, राहुरी, श्रीरामपूर, श्रीगोंदे, अकोले, संगमनेर येथे असलेल्या या दुय्यम कारागृहांची क्षमता ४० ते ५० कैदी ठेवण्याची आहे. प्रत्यक्षात मात्र येथे क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवले जातात. नवीन कारागृहाचा प्रस्तावच अजून गेला नाही नगर तालुक्यातील नारायणडोह येथील ११ एकर जागेवर ५०० कैद्यांची क्षमता असलेले नवीन वर्ग १ चे कारागृह प्रस्तावित आहे. या कारागृहाचा नकाशा आणि आराखडा तयार करण्याचे काम येथील बांधकाम विभागाकडे गेल. अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे नवीन कारागृहासाठी अजून शासनाकडे प्रस्तावच पाठविण्यात आलेला नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
कर्जत येथील कोठडीतून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील इतर उपकारागृहांच्या सुरक्षेबाबत आढावा घेण्याचे आदेश महसूल प्रशासनाला जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. पोलीस प्रशासनाच्या दृष्टिनेही येणा-या काळात योग्य ती दक्षता घेतली जाईल, असे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.सागर पाटील यांनी सांगितले.