अहमदनगर : कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणातील दोषींच्या शिक्षेवर मंगळवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. दरम्यान या प्रकरणातील दोषी जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे या दोघांनीही आम्ही निर्दोष असल्याचे न्यायालयात सांगितले.तिन्ही दोषींच्या शिक्षेबाबत उद्या सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाच्या वतीने उद्या विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर दोषींच्या शिक्षेबाबत न्यायालय निर्णय घेण्याची शक्यता आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्र शिंदे याच्यातर्फे अॅड. योहान मकासरे यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, आरोपीला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो सराईत गुन्हेगार नाही. त्याच्या घरी आई, पत्नी आहे. त्याची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. त्याला फाशी न देता जन्मठेप द्यावी.
नितीन भैलुमे याच्यातर्फे अॅड. प्रकाश आहेर यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, भैलुमेविरोधात कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा न्यायालयात सादर करण्यात आला नाही. सर्व परिस्थीतीजन्य पुरावे आहेत़ आरोपी सराईत गुन्हेगार नाही. त्याच्यावर एकही गुन्हा नाही. तो कॉलेजचा विद्यार्थी आहे़ त्याचे वय अवघे २६ वर्ष आहे. त्याच्या घरात आई, वडील आहेत. आईचे आॅपरेशन झालेले आहे. वडील बाहेर गेल्यानंतर आईची काळजी घ्यायला कोणीही नाही. हे गरीब कुटूंब आहे. या घटनेमुळे त्याचे आयुष्य उद्धवस्त झालेले आहे. त्याच्या भविष्याचा विचार करुन त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी.दोघा वकिलांचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे यांना त्यांच्यावरील गुन्ह्याबाबत विचारले असता त्या दोघांनीही निर्दोष असल्याचे सांगितले. तर जितेंद्र शिंदे याला शिक्षेबाबत विचारले असता तो म्हणाला, ‘शिक्षा एक दिवसाची काय किंवा हजार दिवसाची काय?’