- सचिन धर्मापुरीकरकोपरगाव (जि. अहमदनगर) - कोपरगाव येथे आरक्षणाच्या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू केलेले साखळी उपोषण चोविसाव्या दिवशी म्हणजे रविवारी (दि. २४) स्थगित करण्यात आले.
दि. १ डिसेंबर पासून कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. रविवारी या उपोषणाचा २४ वा दिवस होता. अनिल गायकवाड, अमित आढाव, विनय भगत, लक्ष्मण साताळे, सुनिल साळूंखे यांनी साखळी उपोषण केले. रविवारी तहसीलदार संदीपकुमार भोसले व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भरत दाते यांच्या उपस्थितीत हे साखळी उपोषण स्थगित करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, बाळासाहेब जाधव, बबलू वाणी, संदिप वर्पे, शिवाजी ठाकरे, अशोक आव्हाटे, विक्रांत झावरे, शिवनारायण परदेशी, विजय जाधव, शुभम गवारे, विकास आढाव, संतोष झावरे, प्रमोद नरोडे आदींची उपस्थिती होती.
प्रमोद नरोडे याप्रसंगी म्हणाले की, मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत उपोषण सुरू होते. परंतू मंत्री छगन भूजबळ यांनी भडकावू वक्तव्य करून दोन समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलन चिघळत गेले. शनिवारी जरांगे पाटील यांनी जागो-जागी सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले. २० जानेवारीला मुंबईत सुरू होणाऱ्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील हजारो मराठा समाज बांधव जातील असेही नरोडे यांनी सांगून, साखळी उपोषण स्थगित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.