लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : तालुक्यात एकूण २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ५ ग्रामपंचायतींचा ‘लोकमत’ने सर्व्हे केला. त्यात ३५ वर्षे वयोगटातील सरासरी २५ टक्केच तरुण निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याचे निदर्शनास आले आहे.
कोपरगाव तालुक्यात ७९ गावे असून, ७५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी २९ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ज्यामध्ये सवंत्सर, सांगवी भुसार, उक्कडगाव, तिळवणी, घारी, रवंदे, ओगदी, अंचलगाव, सोनारी, हिंगणी, वेळापूर, देर्डे चांदवड, येसगाव, मढी बुद्रुक, मढी खुर्द, आपेगाव, नाटेगाव, कोळगाव थडी, मळेगाव थडी, मायगाव देवी, मनेगाव, काकडी, जेऊर कुंभारी, धोंडेवाडी, अंजनापूर, कोकमठाण, कासली, टाकळी, जेऊर पाटोदा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या सर्व ग्रामपंचायतींचे १०२ प्रभाग मिळून २७९ सदस्यसंख्या आहे. त्यापैकी सांगवी भुसार ६ व जेऊर कुंभारी १, अशा ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित २७२ जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी ६११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवारी करीत असलेल्या उमेदवारांचा सर्व्हे केला आहे. त्यापैकी सवंत्सर १७, काकडी ११, अंजनापूर ७, येसगाव ११ व कोकमठाण १७ या पाच ग्रामपंचायतींच्या ६३ जागांसाठी एकूण १४७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी सुमारे ३४ उमेदवार हे ३५ वर्षे वयोगटातील असल्याचे समोर आले आहे.
..
जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग हवा
एकंदरीतच भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग असणे अपेक्षित आहे; परंतु सध्या कोपरगाव तालुक्यातील गावपातळीवरील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरासरी २५ टक्केच तरुण सक्रिय आहेत.