कोपरगाव शहरातील द्वारकानगरी येथील आशिष रामदास गवळी या तरुणाची २२ जानेवारी २०२० दरम्यान इंटरनेटवरील वेबसाइटवर एमआरएफ या नामांकित टायरच्या कंपनीची डीलरशिप मिळविण्याच्या नादात तब्बल १९ लाख ७५ हजार ८०० रुपयांची फसवणूक झाली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
२
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरातील जंगली महाराज आश्रमासमोर नगर -मनमाड महामार्गावर २१ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास शिर्डीहून साईबाबांचे दर्शन करून कोपरगावच्या दिशेने जाणाऱ्या मध्यप्रदेश येथील साईभक्तांच्या ओमनी कारचा अपघात झाला होता. या अपघातात कारमधील सपना करेलू सोनगीर (वय- ४० वर्षे) व देवांशी सोनवे (वय ५ वर्षे, दोन्ही रा. धनपायडा, ता. बडवा, राज्य मध्य प्रदेश) हे ठार झाले होते, तर पाच जण जखमी झाले होते.
३
कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील शिवसेनेचे कोपरगाव उपतालुकाप्रमुख सुरेश शामराव गिरे यांची रवी अप्पासाहेब शेटे (रा. रामवाडी, सवंत्सर, ता. कोपरगाव), विजय खर्डे (रा. सवंत्सर, ता. कोपरगाव) व इतर चौघांनी १५ मार्च २०२० रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गिरे यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर तलवारीने वार करून, पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली होती. यातील सर्व आरोपी अटकेत आहेत.
४
कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर येथील २६ मे २०२० रोजी एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या लग्नाची परवानगी मिळावी. यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्यात नवरदेव मुंबई येथील असताना तो कोपरगाव येथील असल्याची खोटी माहिती देऊन फसवणूक केली होती. त्यामुळे लग्नासाठी आलेल्या मुंबई येथील नवरदेव, नवरीसह दोन्हीकडील नातेवाईक अशा १३ जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
५
कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथे १५ जून २०२० रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारस स्वस्तात पैठणी देतो म्हणून डहाणू (जि. पालघर) येथील एका कुटुंबाला बोलून घेत ४ लाख ७७ हजार ५०० रुपयांना लुटले होते. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
६
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर हद्दीतील संजीवनी कारखाना परिसरात ४ जुलै २०२० रोजी मध्यरात्री रात्री १ ते पहाटे ५ वाजेच्या सुमारास घरातील पंख्याला दोरी बांधून बाप- लेकाने गळाफास घेऊन राहुल संजय फडे (वय २७) व संजय रंगनाथ फडे (५०) आत्महत्या केली होती.
७
कोपरगाव शहरातील गांधी पुतळा परिसरातील बालगणेश किड्स वेअर्सच्या मालकाच्या मुलाचे व दुकानात कामाला असलेल्या कामगाराचे १७ जुलै २०२० दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास स्विफ्ट कारमधून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्या दोघांना शिर्डी येथे एका हॉटेलमध्ये दोन दिवस डांबून ठेवत मारहाण करून दहा लाखांची खंडणी मागितली होती. या अपहरणातील चार आरोपींना अटक केली होती.
८
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे २८ ऑगस्ट २०२० रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास पुंजा भागाजी नरोटे (वय ६०, रा. खंडांगळी, ता. सिन्नर, जि. नाशिक) यांना अज्ञात कारणासाठी ठार मारण्याच्या उद्देशाने दोन जणांकडून लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. त्यात नरोटे यांचा मृत्यू झाला होता.
९
कोपरगाव शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यभरात वाढीव वीज बिलाविरोधात २६ नोव्हेंबर २०२० रोजी कोपरगावातील वीज वितरण कार्यालयात जाऊन खळखट्याक आंदोलन करून वीज वितरण कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या दालनाची तसेच खुर्च्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर आंदोलकांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
१०
कोपरगाव शहरातील किशोर वाइन्सचे चालक दिलीप शंकर गौड (रा. निवारा, कोपरगाव) यांना शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकाजवळील भाईभाई गॅरेजसमोर ११ डिसेंबर २०२० रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील बॅगेत असलेले ४ लाख ९८ हजार ९०० रुपयांच्या रोख रकमेसह मोबाइल लुटून नेला होता.