कोपरगाव : मोटार अपघाताचे बनावट कागदपत्रे तयार करून खोटा दावा दाखल करून कोपरगाव न्यायालयाची व विमा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी ॲड. मंगला राजेश कोठारी यांचा जामीनअर्ज फेटाळत त्यांना पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश कोपरगाव न्यायालयाने दिले आहेत.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात २७ नोव्हेबर २०२० रोजी ॲड. मंगला राजेश कोठारी (रा. श्रीरंग अपार्टमेंट गुज्जर गल्ली, अ. नगर ) यांच्यासह आणखी एकावर विमा कपंनीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी ॲड. कोठारी यांनी कोपरगाव न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु, न्यायालयाने शुक्रवारी (दि.४) कोठारी यांचा जामीनअर्ज फेटाळत पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहे.
नंदकुमार छोटुलाल खिच्ची (रा. सावळीविहीर, ता. राहाता) व ॲड. मंगला कोठारी यांनी संगनमताने मोटार अपघातातील बनावट कागदपत्रे तयार करून २२ फेब्रुवारी २००० साली कोपरगाव न्यायालयात खोटा दावा दाखल करून कोपरगाव न्यायालयाची व विमा कंपणीची फसवणूक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी वरील दोघांवर २७ नोव्हेंबर रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून यातील नंदकुमार खिच्ची याला अटक करून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर खिच्ची यास न्यायालयाने प्रत्येक रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश देत जामिनावर सुटका केली आहे. यातील ॲड. कोठारी यांनी कोपरगाव न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळला आहे.