अहमदनगर : शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात माजी महापौर संदीप व त्याचा भाऊ सचिन भानुदास कोतकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटी व शर्तीवर सोमवारी (दि़१३) जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्या. सुरेंद्र तावडे यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी झाली. अशोक भीमराज लांडे यांना १९ मे २००८ रोजी केडगावमध्ये अमानुष मारहाण करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शंकरराव राऊत यांनी न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१३ मध्ये आरोपी भानुदास कोतकर, त्याचे मुले संदीप, सचिन आणि अमोल व इतर साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला नाशिक न्यायालयात वर्ग करण्यात आला. नाशिक जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन सहा जणांना दोषी ठरवण्यात आले. यामध्ये काँग्रेसचा तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, नगरचे माजी महापौर संदीप कोतकर, सचिन व अमोल या चौघांना जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. भानुदास कोतकर याला उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला. त्यापाठोपाठ अमोल कोतकर यालाही जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर माजी महापौर संदीप आणि सचिन यांनी ही अॅड़ अभय ओस्तवाल (औरंगाबाद) यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. ओस्तवाल यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. जामीन कालावधीत या दोघांना जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
लांडे खून प्रकरणात कोतकर बंधुंना जामीन; जिल्हाबंदीची अट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 6:22 PM