कोतूळ : अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातून बोरबनपर्यंत १७० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. यामुळे कोतूळ पूल दहा महिन्यानंतर वाहतुकीस खुला झाला आहे. यंदा पावसाळा जास्त झाल्याने मुळा नदीवरील ६०० दशलक्ष घनफूट पाण्यापैकी मार्च महिन्यात २५० दशलक्ष घनफूट पाणी पहिल्या आवर्तनात आभाळवाडीपर्यंत सोडण्यात आले. शिल्लक ३५० दशलक्ष घनफूट पाण्यापैकी सोमवारी उशीरा १७० दशलक्ष घनफूट पाणी बोरबनपर्यंत सोडण्यात आले. आता धरणात फक्त १२० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे, असे जलसंपदाचे सहाय्यक अभियंता नानासाहेब खर्डे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला सांगितले. वाहतुकीचा अडथळा दूर गेली दहा महिने पाण्याखाली असलेला पूल खुला झाला आहे. अकोले-संगमनेर भाजीपाला व प्रवासी वाहतुकीचा अडथळा दूर झाला आहे. मात्र हे सुख कोतूळकर फक्त पन्नास ते साठ दिवसच उपभोगणार आहेत. जून महिन्यात मान्सून आल्याबरोबर मुळा नदी वाहती होऊन हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद होतो.
कोतूळ पूल दहा महिन्यानंतर वाहतुकीस खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 3:17 PM