शिर्डी: साईबाबा संस्थान व शासनाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारपासून शिर्डीमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू केले. पहिल्याच दिवशी तीन रूग्णांचे घशातील स्त्राव नगरला पाठवण्यात आले आहेत.
या सेंटरवर सात दिवसांसाठी संस्थानचे चोवीस जणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. यात एक सरकारी डॉक्टर आहे. सहा तासांच्या एका शिफ्टमध्ये एक डॉक्टर, एक सिस्टर इंचार्ज, दोन नर्स, दोन वार्ड कर्मचारी यांचा समावेश असेल. संस्थानच्या द्वारकावती भक्तनिवासात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सात दिवस ड्युटी करून ते नंतरचे सात दिवस येथे क्वारंटाईन असतील. सात दिवसानंतर दुसरे पथक येईल़ कोविड केअर सेंटर व डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर असे दोन भाग आहेत.
राहुल द्विवेदी व साईसंस्थानचे सीईओ अरुण डोंगरे यांच्या पुढाकारातून हे सेंटर सुरू झाले़. प्रांताधिकारी गोंविद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, बीडीओ समर्थ शेवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, डॉ. संजय गायकवाड, डॉ. विजय नरोडे, डॉ. मैथिली पितांबरे, डॉ. प्रितम वडगावे उपस्थित होते़.
भाजी विक्रेत्या महिलेला लक्षणे नसल्याने दहा दिवसानंतर नगरहून डिस्चार्ज देण्यात आला. तिच्या दुस-या मुलाचा अहवाल गुरूवारी पॉझिटिव्ह आला. अन्य चौदा जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. तालुक्यात सध्या दहा जण पॉझिटिव्ह आहेत़, असे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.