कोपरगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव परिसरात शेकडो रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत. अशा रुग्णांसह नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत पोहेगाव नागरी पतसंस्था व पोहेगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पोहेगाव येथे कोविड सेंटर उभारणार असल्याची माहिती पोहेगाव नागरी पतसंस्थेचे संस्थापक, शिवसेना नेते नितीन औताडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
औताडे म्हणाले, पोहेगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुसज्ज असे वीस बेडचे कोविड सेंटर परिसरातील नागरिकासाठी देवदुताची भूमिका बजावणार आहे. हे कोविड सेंटर पोहेगाव नागरी पतसंस्था व ग्रामपंचायत यांच्या निगराणीत असणार आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दररोज चहा, नाश्ता व जेवण मोफत मिळणार आहे. आरोग्य विभागाच्या प्रशिक्षित डॉक्टरांकडून रुग्णांची देखभाल करण्यात येणार आहे.
मागील वर्षी देखील पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या वतीने कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी तहसीलदार व आरोग्य अधिकारी यांनी स्वतः कोविड सेंटरची पाहणी केली होती; परंतु त्यामध्ये राजकारण आणून प्रशासनावर दबाव आणून ते बंद पाडण्यात आले. तरी देखील पोहेगाव नागरी पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी राखत महाराष्ट्र राज्य रुग्णकल्याण समितीला रेमडेसिविर खरेदी करण्यासाठी १ लाख ११ हजार रुपये दिले होते. त्यामुळे यंदा कोणी कितीही राजकारण आणले तरी कोणाच्याही विरोधाला जुमानणार नाही.