अहमदनगर : कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून येथील पोलीस कवायत मैदानावर ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले असून, या सेंटरची पाहणी आमदार रोहित पवार यांनी बुधवारी केली.
या वेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे, महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित होते. कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था, महापालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये ऑक्सिजनची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहराचे आमदार संग्राम जगताप हे सेंटरसाठी सहकार्य करणार आहेत. आवश्यकतेनुसार बेड वाढविण्यात येणार असून, सर्व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत. जिल्हाभरातून कोरोना रुग्ण शहरात उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत- जामखेड मतदारसंघातही कोविड सेंटर सुरू केलेली आहेत. या कोविड सेंटरमध्ये रुग्ण उपचार घेत असून, अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, असे सांगण्यात आले.
....