शेवगाव : कोरोनाबाधित रुग्ण घटल्याने तालुक्यातील चापडगाव येथील जनशक्ती कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी दिली.
आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड. शिवाजी काकडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या प्रयत्नातून २४ एप्रिल रोजी जनशक्ती कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. दोनशेहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. यशस्वी उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे उपचारादरम्यान येथील कोविड सेंटरवर एकही रुग्ण दगावला नाही, अशी माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली. शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गरजू लोकांना या सेंटरचा लाभ झाला.
कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची काळजी घेताना आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या वतीने सकाळ, संध्याकाळ गूळवेल काढा, नाश्ता, दोनवेळचे पौष्टिक जेवण, लिंबूपाणी, सुकामेवा व फळे आदी आहार देण्यात येत होता. शिवाजीराव काकडे, हर्षदा काकडे यांनी वेळोवेळी कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांचे मनोधैर्य वाढवत रुग्णांना व्यायामाचे धडे दिले. डॉ. मुकुंद गमे, डॉ. प्रमोद नेमाने, डॉ. सोमनाथ काटे, डॉ. रोहित पाटील, डॉ. गणेश पाडळे यांनी रुग्णांवर यशस्वी उपचार केले. येथे स्वयंसेवक म्हणून अजिनाथ विघ्ने, हेमंत पातकळ, अमोल निकम, नितीन खेडकर, आकाश गोरे, भाऊराव जाधव, बाबासाहेब पातकळ, संजय बोबडे आदींनी काम केले.