कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडीत असलेल्या काही कैद्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. या कैद्यांवर सध्या जिल्हा रुग्णालयासह इतर शासकीय रुग्णालयात उपचार केले जातात. उपचार घेत असलेले कैदी पळून जाऊ नयेत यासाठी पोलिसांना लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे पोलीस प्रशासनावर मोठा ताण आला आहे. अशा परिस्थितीत एकाच ठिकाणी कैद्यांच्या उपचारासाठी कोविड सेंटर असावे, असा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासमोर मांडला होता. या प्रस्तावाला तत्काळ मान्यता मिळून प्रशासनाने नगर शहरातील सैनिक लॉन येथे कोविड सेंटरची उभारणी केली आहे. मंगळवारपासून या सेंटरमध्ये उपचार सुरू केले जाणार आहेत.
क्वारंटाईन ठेवता येणार, उपचारही होणार
आरोपीची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याला कारागृहात पाठविण्याआधी काही दिवस क्वारंटाईन ठेवले जाते. नव्याने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये अशा कैद्यांना काही दिवस क्वारंटाईन ठेवले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोरोनाबाधित कैद्यांवर उपचारही केले जाणार आहेत. आता सर्व बाधित कैद्यांवर एकाच ठिकाणी उपचार होणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांना ही बाब सुकर होणार आहे.
........
कैदी बाधित होत होते तेव्हा त्यांच्यावर जनरल वॉर्डमध्ये उपचार केले जात होते. अशावेळी सुरक्षितेचा प्रश्न होता. त्यामुळे कैद्यांसाठी नगर शहरात स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. आता जिल्ह्यातील विविध उपकारागृहात असलेल्या कैद्यांवर एकाच ठिकाणी उपचार केले जाणार आहेत.
- मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक
ओळी- नगर शहरातील सैनिक लॉन येथे कैद्यांसाठी उभारण्यात आलेले कोळी सेंटर.