काल कोरोना दक्षता समिती चांदेकसारेची सभा घेण्यात आली. यावेळी माजी सरपंच केशवराव होन, सरपंच पूनम खरात, उपसरपंच विजय होन, ग्रामसेवक प्रल्हाद सुकेकर, पोलीसपाटील मीराताई रोकडे, तलाठी दत्तात्रय बिन्नर यांच्यासह कोरोना दक्षता समिती सदस्य उपस्थित होते.
चांदेकसारे परिसरातील रुग्णांसाठी कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय गावातील तरुणांना विश्वासात घेऊन घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सभेत कोरोना आजारासंबंधी कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. ताप, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी व इतर लक्षणे दिसत असल्यास त्वरित त्या व्यक्तीने कोरोना टेस्ट करून घ्यावी. तसेच कुणीही कोरोना संक्रमित पाॅझिटिव्ह व्यक्ती आढळला असेल तर त्या व्यक्तीने कोपरगाव येथे कोरोना सेंटर आहे त्या ठिकाणी दाखल व्हावे. जर तो व्यक्ती गावातच राहून इतरत्र फिरून खासगी ठिकाणी उपचार करताना आढळल्यास त्या व्यक्तीवर व त्याच्या संबंधित कुटुंबावर कायदेशीर पोलीस कार्यवाही करण्यात येईल.
कोरोना रुग्णांना खासगी डॉक्टरांनी उपचार देऊ नये. त्यांना कोपरगाव येथे कोरोना सेंटरला दाखल होण्यास सांगणे. असे न केल्यास आपणाविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल.
गावातील सर्व किराणा दुकाने ठरवून दिलेल्या वेळेत चालू-बंद करावे. जर कुणीही नियमाचे उल्लंघन केल्यास आपणाविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल. गावात विनामास्क, विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले. कोरोना दक्षता समितीत ठरल्याप्रमाणे जर आदेशाचे पालन कुणी केले नाही तर, त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंबंधी वैद्यकीय अधिकारी डॉ. फुलसुंदर व कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनाही सभेचा ठराव पाठविण्यात आला.