दहिगावने : संपूर्ण नगर जिल्ह्यात यावर्षी सुरुवातीच्या काळात पाऊस बेताचाच झाला. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेवगाव तालुक्यातील वरुर, आखेगाव, भगूर आदी भागांतील पूरपरिस्थितीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. हे नुकसान भरून न येण्यासाखे असले तरी शेतातील उभ्या ऊस पिकाला वाचविण्यासाठी दहिगावने येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीकेने) पुढाकार घेतला आहे.
दहिगावने येथील कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख शास्रज्ञ नारायण निबे यांनी ऊस वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. ज्या उसाच्या शेतात पाणी साचलेले आहे, त्या क्षेत्रात उताराच्या बाजूने चर काढावेत. वाळलेले ऊस शेताबाहेर काढावेत. पीक लहान असल्यास वापसा येताच मुळाभोवती एकरी दोन लिटर ट्रायकोडर्मा २०० लिटर पाण्यात मिसळून त्याची आळवणी करावी. नत्र: स्फुरद: पालाश व ८:८:८ व मायक्रोन्युट्रीएंट प्रत्येकी १००मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास पिकाची काळोखी वाढून उसाच्या कोंबाची जाडी व फुटवा वाढण्यास मदत होईल. पाण्यामुळे जमिनीमध्ये मुळे कुजू नये म्हणून १० ग्रॅम कार्बेन्डाझिम १० लिटर पाण्यात मिसळून मुळीभोवती द्यावे. पीक १.५ ते २ महिन्यांचे असेल तर १२:६१:०० व मायक्रोन्युट्रीएंट प्रत्येकी १०० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. वापसा आल्यानंतर एकरी २ गोण्या १२:३२:१६ किंवा १०:२६:२६ व १ गोणी युरिया अशी खतांची मात्रा द्यावी.
ऊस पिकावर लष्करी अळी, पांढरीमाशी या किडी तसेच पोक्का बोइंग, तांबेरा प्रादुर्भाव होणेची शक्यता आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी ६ ते ७ महिने वय असलेल्या ऊस पिकास एकरी १ गोणी युरिया किंवा दोन गोणी अमोनियम सल्फेट व ३० किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. तांबेरा, पानावरील ठिपके, पोक्का बोइंग रोगांचे नियंत्रणासाठी डायथेन एम ४५-२५ ग्रॅम १० लिटर पाण्यांत मिसळून १० दिवसांच्या अंतराने कमीतकमी दोन फवारण्या घ्याव्यात. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रत्येकी १०० मिली बिव्हेरिया व मेटारायजिम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा ४ मिली एमिडाक्लोप्रिड १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.