लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : ऑक्सिजन सिलिंडरच्या तुटवड्यामुळे रुग्णांसाठी मोठा आधार ठरलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची किंमत गेल्या दहा दिवसांमध्ये १५ हजार रुपयांनी वाढली आहे. मुंबई, पुणे व नाशिक येथील विक्रेत्यांकडे आगाऊ पैसे भरूनही मशीनसाठी खरेदीदारांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे सेवाभावी संस्था व दानशूर यांनी खंत व्यक्त केली आहे.
रुग्णालयामध्ये ऑक्सिजन बेड्स सर्वत्र फुल्ल झाले आहेत. त्यामुळे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हा त्याला उत्तम पर्याय ठरला आहे. मात्र, अचानक वाढलेल्या मागणीमुळे त्यांचा पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे या आघाडीवरही आता वेटिंग पाहायला मिळत आहे.
ज्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९४च्या खाली व ८८ ते ९२च्या खाली स्थिरावलेली असते, त्यांच्याकरिता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अधिक उपयोगी ठरते. सिलिंडरप्रमाणे त्यात ऑक्सिजन पुन्हा भरण्याची गरज पडत नाही. त्याचबरोबर घरीही रुग्णांना या मशीनचा वापर करता येतो. पाच ते दहा लीटर क्षमतेमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे कॉन्सन्ट्रेटर बाजारात उपलब्ध आहेत.
---
४० हजारांचे मशीन ५५ हजारांवर
पंधरा दिवसांपूर्वी दहा लीटर क्षमतेच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची किंमत साधारणपणे ४० हजार रुपये होती. आता हेच मशीन ५५ हजार रुपयांवर गेले आहे. अद्यापही ऑक्सिजनचा रुग्णालयांमधील तुटवडा पाहता, कॉन्सन्ट्रेटरकरिता मागणी कायम आहे. त्यामुळे पुढील काळात या किमती आणखी भडकण्याची शक्यता आहे.
----
नाशिक येथील एका विक्रेत्याकडून दहा मशीन खरेदी करण्याची पतसंस्था फेडरेशनची तयारी होती. त्याकरिता एकमुखी निर्णय घेण्यात आला होता. मात्र, संपूर्ण पैशांची आगाऊ मागणी केल्याने आमचा नाईलाज झाला आहे. संस्थेच्या पैशातून धोका पत्करून हे पैसे जमा करणे शक्य नाही.
वासुदेव काळे,
अध्यक्ष, पतसंस्था फेडरेशन, श्रीरामपूर.
----
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे प्रामुख्याने चीनमधून भारतात आयात केले जातात. मात्र, मध्यंतरी कार्गो सेवा बंद होती. त्याचा फटका बसला आहे. मी स्वतः यापूर्वी पाच मशीन रुग्णालयांना दिली आहेत. ३० मशीनची ऑर्डर विक्रेत्यांना दिली असून, दोन दिवसांमध्ये त्यातील दहा मशीन उपलब्ध होतील. रुग्णालय व गरजू रुग्णांना ते वापरासाठी देणार आहे.
श्रीनिवास बिहाणी,
नगरसेवक, श्रीरामपूर.
--