अहमदनगर : शहरात सध्या उड्डाणपुलासह भुयारी गटार योजना, महावितरणचे भूमिगत केबल आणि फेज - २ची कामे सुरू आहेत. हे कमी म्हणून काय दिल्ली गेट ते नीलक्रांती चौक, बालिकाश्रम रोडच्या रस्त्याचे कामही महापालिकेने सुरू केले आहे. त्यामुळे ‘विकास लयी झाला आता बस्स करा’, असे म्हणण्याची वेळ नगरकरांवर आली आहे.
येथील सक्कर चौक ते अशोका हाॅटेलपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला आहे. हे काम रस्त्याच्या मध्यभागी कठडे उभे करून सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जुने बसस्थानक ते जीपीओ चौकापर्यंतच्या मार्गावर वाहतूक कोंडी होते. दुचाकी व चारचाकी वाहने सर्रास याच मार्गाने शहरात येतात. त्यामुळे शहरात वाहनांची एकदम गर्दी होत असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाने नीलक्रांती चौक ते दिल्ली गेट रस्त्याचे काम सुरू केले. हे काम सुरू असल्याने वाहने बालिकाश्रम रोडवरून पुढे जात होती. परंतु, बालिकाश्रम रोड ज्या चौकातून सुरू होतो, तेथील रस्ताही जेसीबीच्या सहाय्याने खोदण्यात आला आहे. हे काम महापालिकेने मंगळवारी सुरू केले. त्यात नेप्ती नाका ते दिल्ली गेट रस्त्याच्या काॅंक्रिटीकरणाचेही काम महापालिका हाती घेणार आहे. हे काम रात्री केले जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येणार नाही, असे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. परंतु, ही सर्व कामे एकाचवेळी सुरू झाल्याने दिल्ली गेट परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे.
उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने चांदणी चौकातून वाहने जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे येतात. परंतु, हा रस्ताही भुयारी गटाराच्या कामासाठी खोदण्यात आलेला आहे. तेथून कोठल्याकडे जाणाऱा रस्ता महावितरणने भूमिगत केबल टाकण्यासाठी खोदला असून, या मार्गावर भुयारी गटार, फेज - २ची कामे सुरू असून, ही कामे करणाऱ्या ठेकेदारांमध्ये समन्वय नाही. या कामावर महापालिकेचे नियंत्रण आहे. परंतु, महापालिकेनेही या कामाचे नियोजन केलेले नाही. वाटेल तिथे रस्ता खोदला जात असल्याने शहरातून प्रवास करणे कठीण झाले असून, सर्वत्र धूळ उडत आहे. या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत.
....
आमदार, महापौरांचे मौन
शहराचा नियोजनबद्ध विकास करणार असल्याचे शहरातील सर्वच नेते भाषणातून सांगत असतात. परंतु, विकास करताना त्याचे नियोजन होताना दिसत नाही. त्याचा त्रास नगरकरांना होत असून, नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला आहे. शहरातील आमदार, महापौरांसह नगरसेवकही मौन बाळगून असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.