नेवासा : तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपौर्णिमेनिमित्तभगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांच्या समाधीचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटे श्री गुरुदेव दत्तपिठाचे प्रमुख गुरुवर्य ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीस अभिषेक घालण्यात आला. यावेळी महाआरती करण्यात आली. पहाटे पासूनच भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. या रांगाचे रूपांतर मोठ्या दर्शन बारीत झाले. सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान ज्ञानसागर सभामंडपामध्ये गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले यांच्यासह हजारो भाविक किर्तनाप्रसंगी उपस्थित होते. दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात आली.यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, सुंदरबाई कन्या विद्यालय, नाथबाबा विद्यालय नेवासा बुद्रुक, खुपटी व बेलपिंपळगाव येथील शाळेच्या सुमारे साडे सहाशे विद्यार्थ्यांनी नेवासा-बहिरवाडी ते देवगड अशी पायी दिंडी काढली.