नेवासा : कार्तिक अमावस्येनिमित्त शनिवारी शिंगणापूर येथे शनि दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी लोटली. दुपारी चारवाजेपर्यंत राज्यभरातून सुमारे पाच लाख भाविकांनी शनिदर्शन घेतल्याची माहिती ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आली.शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजता गृहराज्यमंत्री दीपक केसरकर व आॅस्ट्रेलियाचे शनिभक्त राकेश कुमार यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली. शनिवारी पहाटे त्रिंबक महाराज, डॉ. राहुल हेगडे, खासदार चंद्रकांत खैरे, शनिभक्त जयेश शाह यांच्या हस्ते आरती झाली. शुक्रवारी दुपारी प्रारंभ झालेली अमावस्या शनिवारी सायंकाळपर्यंत होती. त्यामुळे शनिवारी सायंकाळपूर्वीच दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. दिवसभर दर्शनपथ भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.शनिवारी सकाळपासून गर्दी वाढली. मुख्य मंदिरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वाहनांसाठी वाहनतळ करण्यात आले होते. देवस्थानमार्फत पिण्याचे पाणी, आरोग्य, तातडीची अॅम्बुलन्स सेवा यासारख्या सुविधा भाविकांसाठी करण्यात आल्या होत्या.दिल्ली, शिरसा, हरियाणा येथील शनिभक्तांनी भाविकांसाठी मोफत चहा, नाष्टा व जेवणाचे वाटप केले. संगमनेर तालुक्यातील खळी पिंपरी येथील सुमारे ५० युवकांनी शनी शिंगणापूर येथून पायी ज्योत घेऊन गेले. देवस्थानचे अधिकारी व सर्व विभागातील कर्मचा-यांनी शुक्रवारी रात्रभर व शनिवारी दिवसभर अविरत कष्ट घेऊन यात्रा काळात सर्व व्यवस्था सुव्यवस्थित संभाळली. दिवसभरात अभिनेते आदेश बांदेकर, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे यांच्यासह देशातील विविध राज्यातील पद्धधिकारी, अधिकाºयांनी शनिदर्शन घेतले. देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, डॉ़ रावसाहेब बानकर, विश्वस्त अप्पासाहेब शेटे, आदिनाथ शेटे, शालिनी लांडे, उपकार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांनी दानशूर शनिभक्तांचा देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात सन्मान केला. शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या संगीता राऊत यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.
कार्तिक अमावस्येनिमित्त शिंगणापुरात शनि दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 5:39 PM