अहमदनगर : अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेप झालेला भानुदास कोतकर याला मुंबई हायकोर्टाने आज, सोमवारी (दि़ २६) जामिन मंजूर केला आहे. मात्र, हा जामिन देताना न्यायालयाने कोतकरला नगरमध्ये जाण्यास तसेच परदेशात जाण्यास मज्जाव केला आहे. आजारपणाच्या उपचारासाठी हा जामिन मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण
नगरच्या अशोक लांडे खून प्रकरणात भानुदास कोतकर, त्याची तीन मुले माजी महापौर संदीप याच्यासह सचिन व अमोल यांना दोषी ठरवत या चौघांना जन्मठेप सुनावली होती. या प्रकरणातील अन्य आरोपी स्वप्निल पवार व वैभव अडसूळ यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. तर संशयित भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक भीमराज लांडे याचा १९ मे २००८ रोजी केडगावमध्ये मारहाण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी घटनेतील साक्षीदार शंकरराव राऊत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१३ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार हा खटला पुढे नाशिक न्यायालयात वर्ग करण्यात आला. या प्रकरणात भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर, नगरचे माजी महापौर संदीप कोतकर, सचिन व अमोल कोतकर यांच्यासह एकूण १५ जणांवर दोषारोपपत्र ठेवण्यात आले. नाशिकचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन सहा जणांना दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने भानुदास कोतकर व त्याच्या तीन मुलांना जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तर भानुदास कोतकरला तीन वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपयांचा दंड तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी स्वप्निल पवार आणि वैभव अडसूळ यांना दोषी धरत दोन वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. उर्वरित नऊ संशयितांची पुराव्यांअभावी मुक्तता करण्यात आली. त्यात भाजप आमदार कर्डिले यांचा समावेश आहे. कर्डिले यांच्यावर मयताच्या कुटुंबीयांना आर्थिक देवाणघेवाणीचे आमिष दाखविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.