शिर्डी - शिर्डीविमानतळावर उतरणारे विमान धावपट्टीवरुन थेट माळरानावरच गेल्याने विमानातील प्रवाशांची एकच घबराट झाली. स्पाईसजेट कंपनीचे SG946 हे विमान दिल्लीहून शिर्डीला येत होते. त्यावेळी शिर्डी विमानतळावर विमानाचे लँडिंग होताना विमानाची दिशा भरकटली. त्यामुळे विमान धावपट्टी सोडून माळरानावरच गेले. सुदैवाने कुणालाही जखम झाली नसून सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
शिर्डी विमानतळावर उतरणाऱ्या स्पाईसजेट कंपनीच्या विमानाचा सुदैवाने अपघात टळला. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. मात्र, पायलटच्या प्रसंगावधानतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. याबाबत माहिती मिळताच, विमानतळारील कर्मचाऱ्यांनी संबंधित विमानाजवळ जाऊन प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. या घटनेनंतर शिर्डी विमानतळावरील धावपट्टी काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. मदत आणि बचावकार्य अद्यापही सुरू असल्याचे शिर्डी विमानतळाचे संचालक दिपक शास्त्री यांनी सांगितले.
दिल्लीहून शिर्डीला येणारे विमान खाली उतरल्याने गेले दोन तासापासून प्रवासी या विमानात अडकून पडले आहेत. दिल्लीहून सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिर्डी ला येणारे विमान धावपट्टीवर लँड झाले. मात्र, धावपट्टीवरून पार्किंगकडे येताना वळणावर ते दगड माती असलेल्या जागेवर खाली उतरले व रुतून बसले. या विमानात जवळपास 164 प्रवासी आहेत. विमानातून प्रवासी उतरणारा जिना विमानाच्या उंचीला मॅच न झाल्याने प्रवाशांना खाली उतरणे अवघड झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन तासांपासून प्रवासी विमानात अडकले आहेत. त्यांना मागील बाजूने उतरविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. दिल्लीला जाणारी फ्लाईट रद्द करण्यात आली आहे.