अहमदनगर : नगर जिल्ह्यात वीज मीटरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून २,५०० हून अधिक ग्राहकांना मीटर मिळत नसल्याने वीज जोड रखडले आहेत. या ग्राहकांनी वीज जोडणीसाठी पैसे भरले असून आता ते मीटर मिळावे म्हणून महावितरण कार्यालयात चकरा मारत आहेत.
ग्रामीण तसेच शहरी भागात नवीन घर बांधताना किंवा नवीन घराची खरेदी केल्यानंतर ग्राहक नवीन वीज जोड घेण्यासाठी महावितरणकडे ॲानलाईन अर्ज करतात. त्यासाठीचे आवश्यक शुल्कही भरले जाते. महावितरणकडून १०-१५ दिवसांत वीज मीटर देण्याचे सांगण्यात येते, मात्र तीन महिने होऊनही अनेकांना मीटर मिळालेले नाहीत. नगर जिल्ह्यात सध्या २,५०० हून अधिक ग्राहक असे आहेत, ज्यांनी मीटरसाठी पैसे भरले, परंतु त्यांना अद्याप मीटर मिळालेले नाही. महावितरणच्या दारात चकरा मारून हे ग्राहक थकले असून आम्हाला आकडा टाकण्याची परवानगी द्या, अशी उपरोधिक मागणी आता या ग्राहकांकडून होऊ लागली आहे.
दुसरीकडे मीटरचा तुटवडा नसल्याचे महावितरणचे अधिकारी सांगत आहेत. परंतु त्याच वेळी त्यांचेच कनिष्ठ कर्मचारी मीटर वरिष्ठ स्तरावरून प्राप्त होत नाहीत, तर द्यायचे कोठून? ग्राहकांना जास्तच घाई असेल तर त्यांनी स्वत: ते बाजारातून विकत आणावेत, असा अजब सल्ला देत आहेत.
आधीच महावितरणने थकबाकीच्या कारणातून अनेक कृषिपंपांचे वीजजोड तोडले आहेत. त्यावरून शेतकऱ्यांसह इतर ग्राहकांची नाराजी असताना दुसरीकडे पैसे भरूनही मीटर मिळत नसल्याने घरगुती ग्राहकांना आणखी मनस्ताप होत आहे.
-----------
वीजजोड दरातही तफावत
नवीन वीज जोडणीसाठी २,७०० रूपयांचे शुल्क भरण्यास सांगितले जाते. यात मीटर, सर्व्हिस केबल, तार याचा समावेश होतो. जर ग्राहकांनी सर्व्हिस केबल, तार स्वत: आणली तर त्याचे पैसे वजा होऊन साडेअकराशे रूपयांना वीजजोड मिळतो. काही अधिकारी यात ग्राहकांना मीटरही स्वत: बाजारातून आणण्यास सांगतात. नंतर ते तपासून बसवले जाते.
-----------
वीज मीटरचा कोणताही तुटवडा नाही. ग्राहकांना मागणीप्रमाणे मीटर मिळत आहेत. काही ठिकाणी तुरळक तक्रारी असतील तर त्यांनी महावितरणकडे संपर्क करावा.
- संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता
---------
फोटो - ०३ मीटर