बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील शोभानगर येथील श्री चैतन्य गोरक्षनाथ सार्वजनिक वाचनालय वडुले खुर्द संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या जनावरांच्या छावणीत अशोक विठ्ठल धुमाळ ( वय ५५) रा. शोभानगर येथील शेतक-याचा दुर्दैवी मृत्यु झाला.शोभानगर येथे मागील चार महिन्यांपासून श्री चैतन्य गोरक्षनाथ सार्वजनिक वाचनालय संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या छावणीत मयत अशोक विठ्ठल धुमाळ यांची सात जनावरे दाखल होती. जनावरांना रोजचा चारापाणी करावा लागत असल्याने मयत धुमाळ हे छावणीत जनावरांसोबत मुक्कामी असायचे. जनावरांना चारा टाकून ते जनावरांजवळ बाजेवर झोपले होते.सायंकाळी सहाच्या दरम्यान त्यांच्या खिशात मोबाईलची रिंग वाजली ब-याच वेळ रिंग वाजत असल्याने झोपल्यामुळे ते मोबाईल घेत नसावेत असे समजून शेजारील शेतकरी सुनिल श्रीधर दौंड यांनी धुमाळ यांना ऊठवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते उठले नाहीत. त्यामुळे त्यांनी छावणीतील शेतक-यांना बोलावले. सर्वांनी त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते जागे न झाल्याने त्यांना बोधेगाव येथील गणपती रुग्णालयात आणले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मयत धुमाळ यांचे मागे पत्नी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे.
छावणीतच शेतक-याने घेतला अखेरचा श्वास : शेवगाव तालुक्यातील दुर्दैवी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:15 PM