अकोले : भंडारदरा धरणातून व्हाया निळवंडे धरण लाभक्षेत्रासाठी शेतीचे शेवटचे आवर्तन रविवारी दुपारी बारा वाजता सोडण्यात आले. निळवंडेच्या आवर्तन विमोचकातून १५०० क्यूसेक वेगाने पाणी प्रवरा नदी पात्रात झेपावले आहे. निळवंडे धरणाच्या यांत्रिकी विभागामार्फत सुरू असलेले ‘गेट’च्या दुरुस्तीचे काम सुरू होते म्हणून लाभक्षेत्राला आवर्तनाची प्रतीक्षा करावी लागली.निळवंडे धरणातून १५०० क्यूसेकने शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले असून, उन्हाळ्याचे हे तिसरे आणि शेवटचे शेती आवर्तन आहे. आतापर्यंत खरिपासाठी १, रब्बीचे २, उन्हाळ्याचे २ आणि प्रवरा नदीतील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी १ असे एकूण सहा आवर्तने देण्यात आलेली आहेत.शेतीचे हे आवर्तन साधारण २६ ते २८ दिवस सुरू राहील. अंदाजे ३ टीएमसी पाण्याचा वापर होईल, असे जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले. भंडारदरा धरणातून एक दिवस अगोदर शनिवारी १६०० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. सध्या भंडारदरा धरणात ३३२६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. निळवंडे धरणात ६१७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. यांत्रिकी विभागामार्फत निळवंडेच्या गेटचे काम सुरू होते म्हणून आवर्तन सोडण्यास उशीर झाला आहे. प्रवरा नदी पात्रातून आवर्तन सुरू झाल्याने लाभक्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान आवर्तन सोडण्यासाठी वापरात येणाऱ्या एका विमोचक गेटच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. दुसºया गेटच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.