काष्टी : मी निवडणुकीस उभा राहिलो तर मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, मानसिक त्रास दिला जातो. त्यामुळे नेते, कार्यकर्त्यांना वेदना सहन कराव्या लागतात. परंतु विरोधकांना माझ्यावरील एकही आरोप सिद्ध करता आला नाही. भविष्यात एकही आरोप सिद्ध होणार नाही. कोणाला त्रास नको म्हणून आपण यापुढे तालुका पातळीवरील एकही निवडणूक लढविणार नाही, असे श्रीगोंदा बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी स्पष्ट केले.श्रीगोंदा बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनवडी (ता. श्रीगोंदा) येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर होते. राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे म्हणाले, बाजार समितीत नाहाटा यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे बाजार समितीवर किसान क्रांती मंडळाचे वर्चस्व कायम राहणार आहे. आमदार राहुल जगताप म्हणाले, भीमा, घोड नदीवरील बंधारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बंधाऱ्यांना मात्र नावे पुणे जिल्ह्यातील गावांची आहेत. परंतु मी बंधारे केले म्हणून पाचपुते खोटा डांगोरा पिटून जनतेची दिशाभूल करीत आहेत. बाळासाहेब गिरमकर, राजेंद्र नागवडे, धनसिंग भोयटे, संजय जामदार, दिलीप चौधरी, संजय महांडुळे यांचीही भाषणे झाली. (वार्ताहर)
तालुका पातळीवरील शेवटची निवडणूक
By admin | Published: October 20, 2016 1:03 AM